लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेअंतर्गत उपचारासाठी पाठवण्यात आलेल्या १ हजार ४१८ व्यक्तींपैकी १ हजार २०५ जणांची कोरोनाचाचणी करण्यात आली होती. यातील ११७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.नंदुरबार : आरोग्य पथकांनी माझे कुटूंब सर्वेक्षणांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ६४१ घरांना भेटी दिल्या होत्या. पथकांनी १८ लाख ७२ हजार लोकसंख्येपैकी १६ लाख ७३ हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले होते. यात अक्कलकुवा २ लाख ४५ हजार, धडगाव २ लाख २२ हजार, नंदुरबार ३ लाख ५६ हजार, नवापूर २ लाख ६६ हजार, शहादा ४ लाख १२ हजार आणि तळोदा तालुक्यातील १ लाख ७० हजार नागरिकांचा समावेश आहे. मोहिमेंतर्गत २७४ व्यक्तींना ताप, ३४ घसादुखी तर ७२ व्यक्तींमध्ये आॅक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा आढळले होते. या सर्वांपैकी १ हजार ४१८ रूग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. यातील ८५ टक्के जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणात तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यु, स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला. मोहिमेमुळे गाव पातळीपर्यंत कोरोनाविषयी जागृती होण्यास मदत झाली आहे. आरोग्य तपासणी व जनजागृतीमुळे नागरिकांच्या मनातले गैरसमज दूर झाले असून स्वॅब चाचणीसाठी नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. उर्वरीत नागरिकांचे सर्वेक्षण आणि नोंदणीचे काम त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत.
सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी ७ हजार ८६६ व्यक्तींना रक्तदाब, १५९ जणांना कॅन्सर, ५ हजार ७२४ जणांना मधुमेह, १ हजार २३८ जणांना तर आजार २९८ जणांना खोकला असल्याचे दिसून आले होते. हे सर्व अतिजोखिमीच्या गटात येत असल्याने त्याना खबरदारी घेण्याविषयी सांगण्यात आले.