लॉकडाऊनमुळे आदिवासी सोंगाड्या पार्ट्यातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने या कलावतांना जनजागृतीचे काम द्यावे. -नामू सोंगाड्या
रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगेल्या साडेतीन दशकांपासून महाराष्टÑ आणि गुजरातच्या सिमेवर आदिवासी गावांमध्ये आपल्या मनोरंजनातून लोकजागृती करणाऱ्या सोंगाड्या पार्ट्या सद्या आपापल्या गावातच ‘लॉक’ झाल्याने या पार्ट्यांमध्ये काम करणाºया कलावंतांची अवस्थाही रोजगाराअभावी दयनिय झाली आहे. शासनाने या कलावंतांना कोरोना जनजागृतीचे काम देऊन त्यांची उपेक्षा थांबवावी व जनजागृतीची मोहिमही व्यापक करावी अशी अपेक्षा या भागात प्रसिद्ध असलेले सोंगाड्या पार्टीचे कलावंत नामू सोंगाड्या यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.सद्या सोंगाड्या पार्टीतील कलावंत काय करीत आहेत?खरेतर गणेशोत्सवापूर्वी सोंगाड्या पार्टीतील कलावंतांचा सराव सुरू होतो. या काळात नवीन वर्षात कुठला विषय घेऊन जनजागृती करावी, नवीन नाटक, नवीन रोडाली, नवीन संगीत या संदर्भातील चर्चा सुरू होती. त्यामुळे एकत्र येऊन पार्टीतील कलावंत काही सराव करतात. पण यंदा मात्र कोरोनाने सर्वांनाच हतबल केले आहे. लॉकडाऊनच्या नियमामुळे कलावंतही एकत्र येऊ शकत नाही. याउलट गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून कार्यक्रम बंदच असल्याने कलावंतांची अवस्था दयनिय आहे. रोजगाराचे इतर कुठलेही साधन नसल्याने हे कलावंत आपापल्या घरीच असून लॉकडाऊन कधी उठेल आणि कधी आपण सराव करू, कार्यक्रम करू याचीच प्रतिक्षा सर्वांना लागली आहे.आपले कार्यक्रम कधी व कसे असतात.?गणेशोत्सवात काही ठिकाणी कार्यक्रम मिळतात. त्यानंतर नवरात्रोत्सव व दिवाळीपासूनच तर गावोगावी कार्यक्रम सुरू होतात. ते मे अखेरपर्यंत सुरू असतात. या काळात किमान १०० व त्यापेक्षा अधीक कार्यक्रम आपण विविध गावांमध्ये सादर करतो. महाराष्टÑ आणि गुजरातच्या सिमेवरील गावांमध्ये कार्यक्रम होतात. मनोरंजनातून प्रबोधनाचा उद्देश असतो.
शासनातर्फे सोंगाड्या पार्ट्यांना विविध विषयांसंदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम दिले जातात. त्यात खासकरून स्वच्छ भारत अभियान, आरोग्य जागृती, शिक्षण विषयक जागृती कुपोषणासंदर्भातील माता बालकांमधील जागृती हे प्रबोधन आपण आदिवासी बोलीभाषेतून सोंगाड्या पार्टीद्वारे केले आहे.
त्याच धर्तीवर शासनाने आता सोंगाड्या पार्ट्यांना कोरोना संदर्भातील जागृतीचे कार्यक्रम द्यावे. त्यातून सोंगाड्या पार्ट्यातील कलावंतांना रोजगारही मिळेल व शासनाचा गावागावांमध्ये कोरोना संदर्भातील जागृतीचे कार्यही होईल. सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व नियम पाळत असे प्रबोधन सोंगाड्या पार्ट्यांद्वारे होऊ शकते. त्याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. पिढयानपिढ्यापासून सुरू असलेली ही लोककला सोंगाड्या पार्ट्यांनी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.