लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नाशिक येथून पायी प्रवास करीत सातपुड्याच्या दुर्गम भागात धडगाव, सिसाकडे जाणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी सात वाजता येथील माजी नगरसेविका शोभा दिलीप जैन यांनी थांबवून त्यांच्या निवासस्थानी चहा व नाश्ता दिला. आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क करून या मजुरांना गावापर्यंत खाजगी वाहनाने पोहोचविण्याची व्यवस्था करून दिली.नाशिक येथे शिक्षणासाठी गेलेले १५ आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले होते. त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने शेवटी त्यांनी आपल्या गावाला पायी प्रवास करून जाण्याच्या संकल्प केला. पायी प्रवास करून तीन दिवसात ते शहादा शहरात आले. सोमवारी सकाळी डोंगरगाव रस्त्यावरून जात असताना हे विद्यार्थी माजी नगरसेविका शोभा जैन यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यांचे पती दिलीप जैन यांना सांगितल्यावर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या निवासस्थानी आणून त्यांची चहापानाची व्यवस्था करून नाश्ता दिला व थोडी विश्रांती करायला लावली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना समाधान वाटले. दिलीप जैन यांनी आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना धडगाव भागात खाजगी वाहनाने पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यासाठी आमदार राजेश पाडवी यांचे कार्यकर्ते दिनेश खंडेलवाल, खाजगी स्वीय सहायक हेमराज पवार, नगरसेवक संदीप पाटील, माजी नगरसेवक अशोक मुकरंदे यांनी सहकार्य केले.दरम्यान, शहादा शहर हे मध्य प्रदेश सीमेला लागून असल्याने येथून मध्य प्रदेशकडे पायपीट जाणाºया मजुरांचे जत्थे दररोज जात आहेत. या मजुरांना शहरातील सेवाभावी संस्थांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून रायखेडपर्यंत त्यांना सोडण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
धडगाव येथे विद्यार्थी वाहनाने परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:44 IST