कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील आश्रमशाळा बंद होत्या. मात्र २० डिसेंबर २०२० पासून नववी ते दहावीचे तर १५ फेब्रुवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. त्यानुसार तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील ४२ शासकीय व २१ अनुदानित आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आश्रमशाळामधील भौतिक, वैद्यकीय सोयी-सुविधा अनुभव लक्षात घेता याबाबत साशंकता निर्माण केली जात होती. त्यातच तळोदा तालुक्यातील जांभाई येथील शासकीय आश्रमशाळेत एक विद्यार्थी व एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जांभाई येथे भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शासनाच्या आदेशानुसार जांभाई येथील आश्रमशाळेत येणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचे २७ फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. या वेळी ५१ विद्यार्थ्यांचे व १३ कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात आश्रमशाळेत शिकणाऱ्या सहावीतील एका विद्यार्थ्याचा तर शाळेत रोजंदारी तत्त्वावर असणा-या क्रीडा शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत शाळेला मिळाल्यानंतर शाळेत संपूर्ण निर्जंतुकीरण करण्यात आले. प्रकल्प कार्यालयाकडूनही शालेय प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कोरोनाची लागण झालेला विद्यार्थी हा जांभाई गावातील असून तो आश्रमशाळेचा बहिस्थ विद्यार्थी आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे संपूर्ण कुटुंब होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती, अशी माहिती आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे तर कोरोनाची लागण झालेल्या शिक्षकाला उपचारासाठी नंदुरबार येथे पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची लागण झालेला विद्यार्थी व शिक्षक यांच्या संपर्कात शाळेतील नेमके कोणकोण व किती जण आले आहेत, याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता दिसून आली नाही. दरम्यान, मंगळवारी अजून दोन कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंगळवारी शिक्षण विस्तार अधिकारी एन.डी. ढोले, जी.डी. अलखलमल, बी.एम. कदम यांनी प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी दिलेल्या सूचनेनुसार जांभाई आश्रमशाळेला भेट दिली. पाहणीदरम्यान आदिवासी विकास विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपलब्ध सोयी-सुविधाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तत्काळ विलगीकरण कक्ष तयार करण्याचे सांगितले. मंगळवारी आश्रमशाळेत २० आश्रमीय विद्यार्थी तर १६ आश्रमीय विद्यार्थिनी उपस्थित होते. गावातील बहिस्थ विद्यार्थी उपस्थित नव्हते. विद्यार्थ्यांसह शाळेच्या कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण दिसून आले. वसतिगृहात व वर्गात विद्यार्थ्यांमध्ये सहा-सहा फूट अंतर ठेवावे, वसतिगृह व वर्गात जाताना-येताना हात धुऊन जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे रोज तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात यावी व त्याचे रेकॉर्ड मुख्याध्यापकांनी ठेवावे, अशा सूचना शाळेचे मुख्याध्यापक ए.डी. झाल्टे, अधीक्षक विश्वजित कुलकर्णी, स्त्री अधीक्षिका स्वाती कौलवार यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिल्या.