कोरडी झाडे अद्यापही ठरताहेत धोकेदायक
नंदुरबार : शहरातून साक्रीकडे जाणाऱ्या मार्गावर ठाणेपाडा गावापर्यंतची काही कोरडी झाडे वाहनधारकांना धोकेदायक ठरत आहेत. ही झाडे काढून टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या झाडांपैकी काही झाडे जीर्ण झाली आहेत.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची फिरफिर
नंदुरबार : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आलेली नाही. बँकेत कर्ज विचारणा करण्यासाठी शेतकरी बँकांबाहेर थांबून असल्याचे दिसून येत आहे. गेल्या हंगामात शासनाने कर्जमाफीची रक्कम भरल्याने बँकाचे खातेदार असलेले शेतकरी पीककर्जासाठी पात्र आहेत. परंतु यानंतरही बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा दावा शेतकरी करत आहेत.
शनिवार व रविवार पर्यटनासाठी प्राधान्य
नंदुरबार : जिल्ह्यातील तोरणमाळ तसेच सातपुड्यातील प्रेक्षणीय स्थळांसोबतच नागरिक गुजरात राज्यातील पर्यटन स्थळांकडे धाव घेत आहेत. अनलाॅकमुळे शनिवार आणि रविवारी नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
सर्पदंश वरील लसींचा आरोग्य केंद्रात साठा
नंदुरबार : पावसाळ्यात दुर्गम भागात सर्पदंशाच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश वरील लसींचा साठा करुन घेतला आहे. या लसींमुळे दुर्गम भागातील नागरिकांना तातडीने मदत मिळणार आहे.
कांदा दरवाढीमुळे किरकोळ बाजारात तेजी
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागातून बाजारात येणाऱ्या कांद्याला वाढीव दर मिळत आहेत. यातून किरकोळ बाजारात कांदा २० ते ३० रूपये प्रति किलो दराने विक्री होऊ लागला आहे. नंदुरबार तालुक्यासह साक्री तालुक्यातील शेतकरी नंदुरबार बाजार समितीत कांदा विक्री करतात. लाॅकडाऊनमुळे कांदा आवक वर परिणाम झाला होता. परंतु आता पुन्हा कांदा विक्रीसाठी शेतकरी बाजारात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात पथदिवे व हायमस्ट बंदच
नंदुरबार : तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत लावण्यात आलेले पथदिवे व हायमस्ट बंद आहेत. हे पथदिवे व हायमस्ट सुरु करण्याची मागणी आहे. ग्रामपंचायतींनी वीज कंपनीकडे बिल थकवल्याने ग्रामपंचायतींचे पथदिवे व हायमस्टचे कनेक्शन कट केले गेले आहे.
जल नमुने तपासणीवर भर देण्याची मागणी
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात पावसाळ्यात जलजन्य आजारांची भीती असते. यामुळे जल नमुने तपासणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा जल नमुने तपासणी प्रयोगशाळेत संकलित केलेले पाणी नमुने तपासले जात आहेत.
धावपळ थांबली
नंदुरबार : कोरोना आटोक्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली धावपळ थांबली आहे. रुग्णवाहिकांचे सतत वाजणारे सायरन ही मंदावले आहेत. वैद्यकीय अधिकारी व परिचारिका इतर कक्षांमध्ये वर्ग करुन इतर रुग्णांच्या सेवेलाही गती दिली जात आहे.
विजेचा लपंडाव सुरु
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली, वाघोदा, पातोंडा शिवारात सध्या विजेचा लपंडाव सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात सातत्याने वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री केव्हाही वीज बंद होत असल्याने कंपनीने योग्य त्या दुरुस्त्या करण्याची गरज आहे.