नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे शिवारात हळदीच्या कार्यक्रमात मागील कुरापत काढून एकावर तलवार व सळईने हल्ला करण्यात आला़ या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी सध्या फरार आहेत़फिर्यादी प्रताप दगेसिंग गिरासे (३०) रा़ शेवाडे ता़ शिंदखेडा जि़ धुळे हे आपल्या शालकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ढंढाणे ता़ नंदुरबार येथे आले होते़ हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना आरोपी राजू भारतसिंग गिरासे व पाहुबा भारतसिंग गिरासे यांनी प्रताप गिरासे यांना बाहेर ओढत काहीही न बोलता मागील भांडणाच्या वादातून मारहाण सुरु केली़ प्रताप यांच्यावर तलवारीने डोक्यावर व पाठीवर वार करुन जखमी करण्यात आले़ तसेच इतर आरोपींनी लोखंडी सळईने डोक्यावर व पाठीवर बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच प्रताप यांच्या खिशातील ६ हजार रुपये किंमतीचे चांदीचे ब्रॅसलेट व रोख रक्कम घेऊन फरार झालेत़दरम्यान, या घटनेमुळे हळदीच्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांची एकच धावपळ उडाली होती़ प्रताप दगेसिंग गिरासे यांच्या फिर्यादीवरुन राजू भारतसिंग गिरासे, पाहुबा भारतसिंग गिरासे, भारतसिंग आनंदा गिरासे, उषा भारतसिंग गिरासे, निलेश नाना गिरासे, जयपाल रुपसिंग गिरासे सर्व रा़ ढंढाणे ता़ नंदुरबार यांच्या विरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान हाणामारीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक आऱएऩ शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला़ पुढील तपास जी़टी़ पवार करीत आहेत़
ढंढाणे येथे एकावर तलवारीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:55 IST