लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी ६७ टक्के व्यक्ती ह्या नंदुरबार तालुक्यातील असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून यापुढे दर रविवारी सकाळी ९ ते रात्री १२ यादरम्यान कडक संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत़ पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़या उपाययोजनेंतर्गत दर रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना बाहेर पडण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्री दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, पेट्रोलपंप व शासकीय कार्यालये बंद असल्याने रविवारी कोणीही घराबाहेर बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रत्येक रविवारी सवयीचा भाग म्हणून या पद्धतीने संचारबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांविरोधात विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आदल्या दिवशी करावी व संचारबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी कळवले आहे़
जिल्ह्यातील दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी दुकाने आणि बाजार खुले ठेवण्यास दोन तास वाढवून देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत़ जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकान े९ जुलैपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. पूर्वीच्या आदेशानुसार सर्व सुचनांचे पालन दुकान किंवा संबंधित आस्थापना मालकांनी करणे आवश्यक राहणार आहे. मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत हा आदेश काढण्यात आला आहे़ दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी दुकान मालक या वाढलेल्या कालावधीचा उपयोग करू शकतील.