निवेदनात म्हटले आहे की, २४ तास शासनाची व जनतेची सेवा करणाऱ्या कोतवालांना आंदोलनाची वेळ येऊ न देता आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या मान्य कराव्यात. कोतवालांना चतुर्थ श्रेणीची पूर्तता शासन स्तरावर पूर्ण होईपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम समान वेतन या धर्तीवर राज्यातील सर्व कोतवालांना सरसकट १५ हजार रुपये वेतन द्यावे, कोतवाल संवर्गाकरिता ६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र असूनही कोतवालांना वेतनवाढ मिळत नाही, कोतवालांना तलाठी, महसूल सहायक तत्सम पदासाठी ५० टक्के आरक्षण मंजूर करणे, शिपाई संवर्गाच्या सर्व जागा कोतवाल संवर्गातून भरणे, कोरोनाने मयतांच्या वारसांचा अनुकंपा तत्त्वावर सेवेत समावेश करावा, सेवानिवृत्तीनंतर कोतवालास कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्याने सेवानिवृत्त कोतवालास १० लाख रुपये निर्वाह भत्ता मिळावा आदी मागण्यांचा समावेश आहे. अक्कलकुवाचे तहसीलदार सचिन मस्के यांना अक्कलकुवा तालुका कोतवाल संघटनेतर्फे हे निवेदन देण्यात आले. या वेळी कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कोट्या वसावे, उपाध्यक्ष सुभाष भुता ब्राह्मणे, रूपसिंग मोनजी वसावे, सल्लागार मुकुंद सीताराम पवार, सचिव संतोष सत्तर पवार, दिलवरसिंग तडवी, लक्ष्मण आट्या वसावे, सूरसिंग ओजमा पाडवी, सुनीता मनोज पाडवी आदी उपस्थित होते.
कोतवालांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST