नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात दरवर्षी होणारे यात्रोत्सव यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहेत. यातून छोटे व्यवसाय ठप्प झाले आहेत. या प्रामुख्याने खेळणी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, शोभेचे दागिने विक्रेते यांना फटका बसला आहे. यंदा एकाही व्यावसायिकाला व्यवसाय न करता आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आल्याची माहिती आहे.
पोदार स्कूलसमोर रस्ता पुन्हा धोकेदायक
नंदुरबार : शहरातील तळोदा रस्त्यावर पोदार स्कूलसमोर महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. परंतु हे काम अत्यंत कुचकामी ठरले असून पुन्हा खड्डे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यातून वाहनधारकांना त्रास होत आहे.
बाजारात द्राक्षांची आवक सुरू
नंदुरबार : नाशिक जिल्ह्यातील विविध भागात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. बाजारात सध्या द्राक्षांचे दर वाढीव असले तरीही खवय्यांची पसंती ठरत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेत काळ्या द्राक्षांचीही विक्री सुरू झाली असल्याचे दिसून आले आहे. येत्या काही दिवसात आवक वाढणार असून यातून दरही कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
चटणीला मागणी
नंदुरबार : शहरातील ओळख असलेल्या मिरचीपासून तयार केलेल्या चटणीला मागणी वाढली आहे. जिल्ह्याबाहेरुन अनेक जण शहरात येऊन तयार मिरची पावडर खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध भागात पावडर तयार करणारा उद्योग पुन्हा तेजी पकडत आहे.
पाण्यामुळे अडचणी
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात तयार केलेल्या साठवण बंधाऱ्यांचे पाणी ग्रामस्थांना त्रासदायक ठरत आहे. पाण्याचा उपसा नसल्याने त्यावर शेवाळ येऊन डास पैदास होत आहे. यामुळे पाण्याचा उपसा करण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पथदिवे सुरू करण्याची मागणी
नंदुरबार : शहरातील गुरव चाैक ते गुरुकुल चाैफुलीपर्यंत तयार करण्यात आलेल्या चक्री मार्गावर पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. या मार्गावर नागरिक रात्री उशिरा व पहाटे फिरण्यासाठी येतात. अंधार असल्याने साप व विंचवांचा धोका असतो. तसेच अंधारामुळे वृद्धांनाही अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुर्गंधीमुळे हाल
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारातील गुरुकुल नगर एक आणि दोन या भागात गटारींच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करूनही गटारी दुरुस्ती करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी गटारींवर घाण आहे.
हिंस्र प्राण्यांची भीती
तळोदा : शहरालगतच्या गुजरात हद्दीत बिबट्याचा संचार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरालगत यापूर्वीही हिंस्र प्राणी दिसून आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पुन्हा बिबट्या दिसून येत असल्याच्या प्रकारांनी चिंता वाढल्या आहेत. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बसेसवाढीकडे दुर्लक्ष
अक्कलकुवा : सातपुड्याच्या दुर्गम भागात एसटी बसेस वाढीची सातत्याने मागणी सुरू आहे. परंतु गेल्या आठ महिन्यात दुर्गम भागात बसेस वाढ करण्याकडे दुर्लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. मोलगी, वडफळी तसेच भगदरी मार्गावर बसेस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
रस्ता काम संथगतीने
वाण्याविहीर : अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान रस्ता काम सध्या सुरू आहे. परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून कामाची गती वाढावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खोदकाम झाल्याने वाहतूकदारांचे हाल होत असल्याचे दिसून आले आहे.