नंदुरबार : जिल्हा रुग्णालय आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल अशा दोन्ही ठिकाणी सध्या ५०० कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. या उपचार घेणा-यांची सेवा करण्यासाठी नियुक्त डाॅक्टर, परिचारिका, परिचर, शिपाई आणि सफाई कामगार यांनाही पीपीई कीट घालावा लागतो. सध्या वाढत्या उष्णतेत हा पीपीई कीट कर्मचा-यांना त्रासदायक ठरत असून कोरोना नाही, पण पीपीई कीटमुळे गुदमरुन मरु अशी भावना व्यक्त करत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यासाठी खरेदी करण्यात आलेले पीपीई कीट हे हाय पाॅलिमर कापडापासून तयार करण्यात आलेले असल्याने त्यांचे वजन हे इतर कीटपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे कीट बहुतांश सैलच असल्याने कमी उंचीच्या परिचारिका व वैद्यकीय अधिकारी यांना त्यातून वावरणेही अडचणीचे ठरत आहे. परंतू हे कीट सर्वतोपरी सुरक्षित असल्याचे बोलले जाते.
पीपीई कीटचे वजन अधिक आहे. यामुळे रुग्णापर्यंत जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बाहेरील तापमान हे ३९ पर्यंत पोहोचत असताना पीपीई कीट घालून वावरणे खूप कठीण आहे. त्यात सात ते आठ ता ड्यूटी करणे कठीण आहे. आतील बाजूस सातत्याने घाम येतो. परंतू हे काम महत्त्वाचे आहे.
-महिला वैद्यकीय अधिकारी, सिव्हील,नंदुरबार
प्रशासनाने चांगल्या दर्जाचे कीट खरेदी केले आहेत. यातून रुग्णांची सेवा करणा-या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, यांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने प्रत्येकाला पीपीई कीट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-डाॅ. के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.,