नंदुरबार : ११२ नंबर डायल करताच लागलीच सिंघम टाईल्स पोलीस आपल्यापर्यंत पोहचून आपल्याला मदत करणार. ही योजना लवकरच जिल्ह्यात देखील लागू होणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. यासाठी लागणारी वाहने लवकरच नंदुरबार पोलीस दलात दाखल होणार आहेत.
संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी म्हणून पोलिसांचा १०० नंबर हा मदतीचा हात राहत आहे. परंतु आता विज्ञान, तंत्रज्ञानात प्रगती झाल्याने नवीन तंत्रज्ञानाची जोड देत आता पोलिसांनीही संपुर्ण राज्यासाठी एकच हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ११२ हा तो नंबर राहणार आहे.
कुठूनही हा नंबर डायल केल्यास आपल्या लोकेशनची पडताळणी करून लागलीच स्थानिक पोलीस आपल्यापर्यंत पोहचून आपल्याला मदत करणार आहेत. या प्रणालीसाठी नंदुरबारात १९४ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली असून ९२ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कॅाल येताच कळणार संबधिताचे लोकेशन...
११२ नंबरवर कॅाल येताच कॅाल करणाऱ्याचे लोकेशन नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या व्यक्तीला लागलीच मदतीचा हात मिळणार आहे. शिवाय कायदा व सुव्यवस्थेची स्थितीचा प्रश्न असल्यास तो देखील या माध्यमातून लागलीच सुटणार आहे. शिवाय कुणी मुद्दाम हा नंबर डायल केल्यास पोलिसांचा वेळ वाया न घातल्यामुळे कारवाई देखील होणार आहे.