लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथे यात्रोत्सवानिमित्त गर्दीचा फायदा घेवून चोरटे सक्रीय झाले आहेत. दोघांच्या खिशातून पाकीट मारून प्रत्येकी दहा व ११ हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली. दरम्यान, दुसऱ्या घटनेत चोरट्याला पाठलाग करून पकडून देत पोलिसांच्या ताब्यात दिले.अक्कलकुवा येथे कालिका मातेचा यात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. या गर्दीचा फायदा घेवून चोरटे सक्रीय झाले आहेत. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.कोंबडीच्या व्यापाºयाच्या खिशातून चोरट्यांनी दहा हजार रुपये चोरून नेल्याची पहिली घटना बसस्थानक परिसरात घडली. नंदुरबार येथील कोंबडी व्यापारी शेख सुलतान अब्दुल गनी हे व्यापारासाठी अक्कलकुवा येथे गेले होते. बसस्थानकावर सकाळच्या वेळी गर्दीत त्यांच्या खिशातून चोरट्यांनी दहा हजार रुपये चोरून नेले. त्यांनी ठिकठिकाणी तपास केला असता मिळून आले नाही. त्यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार वसावे करीत आहे.दुसरी घटना यात्रोत्सवात घडली. शिवा जमल्या तडवी, रा.चुलवड, ता.धडगाव हे यात्रेत फिरत असतांना त्यांच्या पॅण्टच्या खिशातून शैलेंद्र नारसिंग पाडवी रा.भगदरी, ता.अक्कलकुवा व त्याच्या सोबतच्या लहान मुलाने ११ हजार रुपये काढून पळ काढला. ही बाब तडवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत शिवा जमल्या तडवी यांच्या फिर्यादीवरून शैलेंद्र पाडवी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार जाधव करीत आहे.
अक्कलकुवात पाकीटमारांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:51 IST