गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीचा बर्ड फ्लूचा अहवाल भोपाळ प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्याने गुजरात पशुसंवर्धन विभागाने किलिंग ऑपरेशन सुरू केले आहे. गुजरात प्रशासनाने महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या नेतृत्वाखाली किलिंग ऑपरेशन सुरू केले आहे. गुजरात राज्यातील तापी, सुरत, नवसारी, डांग जिल्ह्यातील एकूण १७ पथके असून त्यात साधारण ९० पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांना टॅमी फ्लूचा गोळ्या देऊन पीपीई किट परिधान करून किलिंग ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आले. तापी जिल्ह्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीतील दोन शेडमध्ये एकूण १७ हजार कुक्कुट पक्षी व २० हजार अंडी आहेत. येथील ऑपरेशन मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरू केले. पहिल्या टप्प्यात ७ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत ७ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. बुधवारी उर्वरित दहा हजार पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी गुजराचे पशुसंवर्धन उपसंचालक डॉ. अमरनाथ वर्मा, राज्य ईएमओ डॉ. उमंग मिश्रा, राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षद पटेल, उच्छल पोलीस उपनिरीक्षक राजकुमार लोह, मयूर चौधरी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विजय परमार यांच्यासह जिल्हा व तालुका आरोग्य पथकाने उच्छल येथील पोल्ट्री फार्मला भेट दिली. बर्ड फ्लू आणि पुढील किलिंग ऑपरेशन मोहिमेसाठी आरोग्यविषयक कामांबाबत टीमला मार्गदर्शन करण्यात आले. उच्छल तालुक्यात एकूण तीन पोल्ट्री आहेत. इतर दोन पोल्ट्री तीन किलोमीटर अंतरावर आहेत. नवापूर शहरातील अनेक पोल्ट्रींना यापासून धोका होऊ शकतो. एक किलोमीटर त्रिज्येतील नवापूर शहरातील पोल्ट्री येत असतील त्यातील पक्षी व अंडी नष्ट करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे.