लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने मंदाणे ता़ शहादा येथील युवकाची दोघांनी फसवणूक केली़ सात लाख रुपये देऊनही नोकरी न दिल्याने युवकाने पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली़ मंदाणे ता़ शहादा येथील निखिल गौतमचंद जैन याने 2018मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली होती़ यादरम्यान त्याच्यासोबत मोहित शर्मा रा़ बेंगलुरु (कर्नाटक) व संमित कुमारसिंग रा़ सिकंदराबाद या दोघांनी संपर्क केला होता़ दोघांनी निखिल याच्याकडून कागदपत्रांची मागणी करुन नोकरी देण्याचे सांगितले होत़े दोघांच्या भूलथापांना बळी पडून निखिल याने प्रतिसाद दिला होता़ दरम्यान दोघांनी सात लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती़ ही मागणी पूर्ण करत संमित कुमारसिंग याच्या खात्यावर निखिल याने पैसे जमा केले होत़े ऑक्टोबर 2018 मध्ये पैसे दिल्यानंतरही दोघांनी कोणत्याही प्रकारे नोकरी न मिळवून देता वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली होती़ जानेवारी 2019 र्पयत हा प्रकार सुरु होता़ दोघांकडून पैसे मिळण्याची शक्यता मावळल्याने अखेर निखिल जैन याने शहादा पोलीस ठाण्यात धाव घेतली़ त्याच्या फिर्यादीवरुन मोहित शर्मा आणि संमित कुमार सिंग या दोघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला करत आहेत़ दरम्यान पोलीसांनी दोघांची माहिती काढणे सुरु केले असून दोघांची नावे बोगस असण्याची शक्यता वर्तवली गेली आह़े दोघांनी नंदुरबार जिल्हा किंवा शहादा परिसरातील आणखी युवकांसोबत संपर्क केला असण्याची शक्यताही वर्तवली जात आह़े बेरोजगारांच्या फसवणूकीच्या घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त होत आह़े
नोकरीच्या बहाण्याने मंदाण्याच्या युवकाची सात लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 11:55 IST