नंदुरबार : आचारसंहिता काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकुण ३६ लाख ९९ हजार ९७६ रुपयांची अवैध दारू वाहनांसह जप्त केली. मतदान होईपर्यंत विभागातर्फे ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली.जिल्हा मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सिमेवर असल्यामुळे या दोन्ही राज्यात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू वाहतूक होते. शिवाय जिल्ह्यातही अवैध दारूची विक्री काही ठिकाणी होते. निवडणूक काळात अशा अवैध दारू वाहतूक व विक्रीवर कारवाईच्या सक्त सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गेल्या सव्वा महिन्यात जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने तब्बल १२१ केसेस केल्या. त्यातून ३६ लाख ९९ हजार ९७६ रुपयांची वाहनासह अवैध दारू जप्त करण्यात आली. ९० जणांना अटक करण्यात आली आहे.निवडणूक काळात उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळी पथके नियुक्त केली आहेत. जिल्ह्याच्या सिमेवर तसेच जिल्हाभरात ही पथके निगराणी ठेवत असून कारवाई करीत आहेत. निवडणूक अर्थात मतदान होईपर्यंत याबाबत सक्त कारवाई कायम राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक मोहन वर्दे, निरिक्षक शैलेंद्र मराठे यांनी दिली.
आचारसंहिता काळात ३७ लाखांची अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:01 IST