नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही ३७ हजार ५२३ एवढी झाली आहे. विविध वयोगटांतील नागरिकांना हा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार घेत कोरोनावर मात केली होती. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात वयाची ७० वर्षे पार केलेले २५ टक्के रुग्ण आढळून आले होते. यांतील २३ टक्के नागरिक बरे झाले असून, दोन टक्के ज्येष्ठांचा मात्र मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजअखेरीस कोरोना संसर्गमुक्त नागरिकांची संख्या ही ३६ हजार २३३ आहे. वेळेवर उपचार घेतलेल्याने हे नागरिक बरे झाले आहेत. यात ज्येष्ठांचा समावेश आहे. कोरोनाची बाधा झालेल्या बहुतांश ज्येष्ठांनी वेळेवर उपचार आणि व्यायाम सुरू ठेवल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वाढत्या वयात दिल्या जाणाऱ्या औषधांतून रिॲक्शन होण्याची शक्यता असल्याने डाॅक्टरांकडूनही काळजी घेऊनच उपचार दिले जातात. या उपचारांना ज्येष्ठांकडून प्रतिसाद दिला गेला होता. कोरोनातून बरे होऊन घरी परतू असा विश्वास सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठांनी व्यक्त करीत कोरोनावर मात केली होती. विशेष म्हणजे बाधा झालेले ९० टक्के ज्येष्ठ रुग्णालयात दाखल झाले होते.
दुसरी लाट जिल्ह्यासाठी धाेक्याची होती. जानेवारी महिन्यापासून मृत्यूचे सत्र सुरू होते.
जिल्ह्यात आजअखेरीस झालेल्या ८५२ पैकी ४२१ मृत्यू ज्येष्ठांचे आहेत.
वय वर्षे ६० पार केलेल्या या नागरिकांचे मृत्यू हे गेल्या वर्षापासून सुरू आहेत. जानेवारी ते जून या काळात २५२ जणांचा मृत्यू झाल्याने ही लाट नुकसानीची ठरली.
गेल्या काही काळात ज्येष्ठांचा पाॅझिटिव्हिटी रेटही अधिक असल्याचे सांगण्यात आले.
१४ एप्रिल रोजी नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालो होतो. या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर सकारात्मक विचार ठेवून बरा झालो. उपचार घेऊन घरी परतल्यावर एक महिना शेतात राहून योग्य आहार व व्यायाम घेतला. सकारात्मक विचारांसोबतच योग्य तो आहार कोरोनाला दूर पळवतो.
- जयसिंग माळी (वय ७१) मोड, ता. तळोदा.
कोरोना हा बरा होणारा आजार आहे. या आजारातून बरे होण्यासाठी मन स्थिर ठेवत सकारात्मक विचार करून इतरांशी संवाद साधत राहिले पाहिजे. कोरोनातून बरे होण्यासाठी प्रामुख्याने योग्य आहार व श्वसनाचा व्यायाम नियमित करण्याची गरज आहे. कोरोनामुक्त झाल्यावर व्यायाम नित्याचा ठेवल्यास आजार दूर राहतात.
- मोहन ओंकार पाटील, (वय ७४), नंदुरबार.