लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातपुडा चांगलाच सजला आहेत. सद्यस्थितीत पाऊस बंद असून सुट्टीच्या दिवशी तरुणाईला सातपुडय़ातील निसर्ग सौंदर्याचा मोह आवरता येत नाही. त्यात बिलगाव ता.धडगाव येथील बारामुखी धबधब्याचा विशेष उल्लेख करता येतो. परंतु पर्यटकांसाठी बिलगाव येथे आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हे ठिकाण धोक्याचे ठरत आहे. सातपुडय़ात यंदाच्या पावसामुळे काही प्रमाणातील नुकसान वगळता पाऊस चांगलाच झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पर्यटकांना खुणावणारी सातपुडय़ातील स्थळांच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. याशिवाय लहान-मोठे धबधबेही ओसंडून कोसळत असल्याने हे ठिकाण जिल्ह्यातील उत्साही तरुणांना खुणावत आहे. सुटिचा दिवस राहिल्यास तरुणाईची पावले आपसुकच सातपुडय़ाकडे वळत आहे. पर्यटकांना खुणावणा:या स्थळांमध्ये तोरणमाळनंतर बिलगाव ता. धडगाव येथील बारामुखी धबधब्याचा प्रामुख्याने उल्लेख होत आहे. याशिवाय तळोदा तालुक्यातील वाल्हेरीचा देखी उल्लेख होत आहे. बिलगावच्या धबधबा हा बारा धारांचा असल्यामुळे त्याला बारामुखी म्हटले जात असून त्याचे प्रत्येक पर्यटकांना आकर्षण आहे. तेथे भेट देणा:या पर्यटकांची संख्या लक्षात घेत तेथे सुरक्षा व्यवस्था बळकट होणे आवश्यक आहे. सुविधेसाठी मागणीही होत आहे, परंतु कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे स्थळ वर्षानुवर्षे असुरक्षित राहिले आहे. सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी पर्यटन स्थळ विकासांतर्गत शासनामार्फत निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यामुळे या ठिकाणाचा विकासापाठोपाठ तेथे सुरक्षेच्या सुविधा होतील, पर्यायाने पर्यटकांच्या संख्येत भर पडत शिवाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. निधीसाठी शासनस्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तीन वर्षापूर्वी तळोदा येथील तळोदा येथील सात युवक तेथे गेले होते. त्यापैकी पाटील परिवारातील दोघा संख्ख्या भावांचा या धबधब्यात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेमुळे तेथील असुरक्षीतता शासनाच्या निदर्शनास येऊन तेथे सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे वाटले होते. परंतु पर्यटकांची ही भाबडी आशा निराधार ठरली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजांनी गरज आहे. उत्साही तरुण आकर्षणामुळे धोका पत्करुनही या ठिकाणी नेहमी वावरताना दिसून येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी सुविधा करता आली नसली तरी या धबधब्याची चांगली माहिती असलेल्या व्यक्तीला तेथे नेमणे गरजेचे आहे. पावसाळ्यातही तरुणाई त्याकडे वळत असल्याने धोक्याची पातळी अधिक वाढली आहे.
बारामुखी धबधबा परिसरातील सुरक्षा वा:यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:45 IST