नंदुरबार : तालुक्यातील रजाळे ते नंदुरबार रस्त्यावर गेल्या १५ ते २० दिवसांपासून काटेरी झाड उन्मळून पडल्याने याठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच मोठा खड्डा असून भिषण अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे गावकरी व वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधितांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे झाड तोडून रस्ता मोकळा केला आहे.
या रस्त्यावरून दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असते. गावापासून हाकेच्या अंतरावरच हे झाड अनेक दिवसांपासून जैसे थे अवस्थेत पडून होते. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झुडपांचाही विळखा वाढला असून, समोरून येणारी वाहनेही दिसत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. हे झाड पडल्याने या ठिकाणी केवळ दुचाकी निघेल इतका रस्ता असल्याने अवजड वाहनांना मोठी कसरत करून वाहन काढावे लागत होते. अनेकदा या ठिकाणी वाहतूकदेखील ठप्प होत होती. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा वाहनधारक रात्रीच्या सुमारास प्रवास करत असताना या ठिकाणी उन्मळून पडलेले झाड नजरेत येत नसल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत होते. उन्मळून पडलेले झाड त्वरित काढण्यात यावे, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांमध्ये जोर धरू लागली होती. अन्यथा त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिनेश फकिरा पाटील यांनी दिला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच दुसऱ्याच दिवशी संबंधितांनी बातमीची दखल घेत रस्त्यावर पडलेले झाड तोडून बाजूला केले आहे. त्यामुळे रजाळे येथील गावकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.