नंदुरबार : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटत असल्याने शासकीय रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये अवघे १०६ जण उपचार घेत आहेत. अनेक कोविड सेंटरमध्ये तर शुकशुकाट आहे. असे असले तरी या जिल्ह्यातील कुठलेही कोविड सेंटर बंद होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे कोविड सेंटरची विशेष रेल्वेदेखील अद्यापही नंदुरबार स्थानकातच उभी आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात कहर करणाऱ्या कोरोनाने आता जिल्हावासीयांना उसंत दिली आहे. रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. पॅाझिटिव्हीटी रेट अवघा ४.७० पर्यंत घसरला आहे. त्यामुळे ब्रेक दि चेनअंतर्गत विविध बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. हाऊसफुल्ल राहणारी कोविड रुग्णालये आणि कोविड कक्ष आता सामसूम होऊ लागले आहेत. जिल्हाभरातील शासकीय कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये अवघे १०६ रुग्ण दाखल आहेत.
कोविड सेंटर बंद होणार नाही
जिल्हा व प्रत्येक तालुका स्तरावर उभारण्यात आलेेले कोविड सेंटर बंद न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तिसरी लाट कधी व कशी येईल याची शाश्वती नाही. असे असले तरी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवली आहे. त्यामुळे नंदुरबारातील दोन कोविड सेंटर व एक रेल्वे कोविड सेंटर आणि जिल्हा रुग्णालयातील उपचार कक्ष कायम सुरू आहेत. काही ठिकाणी रुग्ण नसले तरी ते सज्ज ठेवण्यात आले आहेत. शहादा शहरातील दोन व तालुक्यातील एक, तळोदा तालुक्यातील दोन, अक्कलकुवा तालुक्यातील तीन, धडगाव तालुक्यातील तीन, नवापूर तालुक्यातील तीन कोविड सेंटर व रुग्णालय अद्यापही सुरू आहेत. त्यापैकी अनेकांमध्ये एकही रुग्ण नाही.
कोविड कक्षाची रेल्वे उभीच
रेल्वे विभागाने जिल्ह्यासाठी विशेष कोविड कक्षाची रेल्वे उपलब्ध करून दिली होती. गेल्या दीड महिन्यापासून ती नंदुरबार स्थानकात उभी आहे. साधारणत: तीन आठवडे या रेल्वे कोविड कक्षात रुग्ण भरती करण्यात आले होते. साधारणत: दीडशे रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतला होता. येथील रुग्णसंख्या एका वेळी ५५ रुग्णांपेक्षा अधिक गेली नाही. रुग्णसंख्या कमी झाल्याने येथील रुग्ण दुसऱ्या कक्षात हलविण्यात आले. असे असले तरी ही रेल्वे अद्यापही नंदुरबार स्थानकात उभी आहे. पुढील परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि मागणीप्रमाणे ती पुढील स्थानकात जाणार आहे.
लॅाकडाऊन शिथिल
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. सर्वच वस्तू विक्रीची दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे या काळात बाजारात प्रचंड गर्दी असते. नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता किंवा मास्कचा वापर न करता फिरत आहेत. हा बेफिकीरपणा कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी थोडी सक्तीची भूमिका घेऊन शिस्त लावावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
खासगी रुग्णालये
खासगी रुग्णालयांमध्येदेखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. एकूण २१ खासगी रुग्णालयांना कोविड उपचारांची मान्यता देण्यात आली होती. यापैकी १६ रुग्णालयांमध्ये तर एक किंवा दोन रुग्ण आहेत, काहींमध्ये तर एकही रुग्ण नाही. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांनी आता कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.