लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील एका खाजगी कृषी केंद्रातून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली जात असल्याचा व जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.खरीप पेरणीचा हंगाम व त्यातच दोन दिवस शहर बंद राहील्याने सोमवारी बाजारात सर्वसमावेशक गर्दी झाली होती. शहरात बी-बियाण्यांच्या दुकानांवरही शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली. याचा फायदा घेत की काय एका दुकानावरून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली गेली. हा प्रकार काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुकानदारास जाब विचारला. गर्दीत हा प्रकार झाला असावा व शेतकºयांनी अशी मुदतबाह्य औषध परत आणल्यास बदलून देण्यात येईल असे सांगितल्यावर या प्रकारावर पडदा पडला.शहरातील रासायनिक खत विक्रेते सर्रासपणे जादा दराने खताची विक्री करीत असल्याची ओरड या निमित्ताने झाली. एकीकडे खताची मात्रा मागणीपेक्षा कमी उपलब्ध होत आहे तर दुसरीकडे जादा दराने विक्री करून सर्रास शेतकºयांची लूट आणि फसवणूक केली जात आहे. कृषी विभागाच्या या प्रकारावर अंकुश दिसून येत नाही. शेतकरी लॉकडाऊनमध्ये आधीच परेशान झाले असून, त्यांना नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केल्यानंतर तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी बियाणे व रासायनिक खतासाठी बाजारात गर्दी करत आहे. बाजारात चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री होत असल्याने व पाहिजे तेवढे खत उपलब्ध होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीची कामे सोडून त्यास पूर्ण दिवस बाजारात बी-बियाणे व खत खरेदीसाठी लांब रांगेत उभे रहावे लागत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी शहरातील कृषी केंद्रातून कीटकनाशके खरेदी करीत आहे. मात्र कृषी केंद्रातून खराब व मुदतबाह्य कीटक नाशके विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक होत असल्याने नवापूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष जालमसिंग गावीत यांनी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दुबार पेरणीचे संकट, पुरेश्या प्रमाणात न होणारा खतसाठा, मुदत संपलेले कीटकनाशक विक्री व जादा भावाने होणारी रासायनिक खताची विक्री संदर्भात संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
नवापुरात मुदत संपलेल्या कीटक नाशकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:05 IST