महेश पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : लाॅकडाऊनमध्ये गो-सेवेचे महत्त्व जाणून यू-ट्यूबवर माहिती मिळवीत असताना गो सेवेचा छंदच जडला आणि चार महिन्यात पाहता पाहता तब्बल ५० गीर गायींचा तबेला साकारला. नवापूर येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावीत यांचा हा अनोखा उपक्रम असून देशी गायींच्या अभ्यासकांसाठी ते एक मार्गदर्शन केंद्र ठरत आहे. भरत गावीत यांचे नवापूरलगतच शेत असून या शेतातच हा तबेला त्यांनी उभा केला आहे. याठिकाणी गीर गायीतील विविध प्रजाती असून गो सेवेत ते स्वत: रमल्याने त्याला अधिकच महत्त्व आले आहे. दुर्मीळ आणि गायींच्या प्रजातीत सर्वोत्तम महत्त्व असलेली सुवर्ण कपिला या गायीच्या प्रजातीही येथे आहेत. याशिवाय शाम कपिला, श्वेत कपिला, लीलडी गाय, कापरी गाय अशा विविध प्रजाती आहेत. या सर्व गायी त्यांनी देशभरातून विविध ठिकाणाहून आणल्या आहेत.यासंदर्भात भरत गावीत यांनी सांगितले की, यू-ट्यूबवर आपण गीर गायींसंदर्भात माहिती वाचली. त्यामुळे या गायी आणण्याचा ध्यास लागला. पहिली गाय आपण धुळ्याहून आणली. त्यानंतर विविध प्रजातींची माहिती घेत अजमेर, राजकोट, अहमदाबाद यासह मध्य प्रदेशातून तब्बल ५० गायी आपण आणल्या आहेत. गो सेवेत समाधान मिळत असल्याने तो एक छंदच जडला आणि त्यातून हा एक भव्य तबेला येथे उभा झाला. अजून विविध प्रजातींच्या ५० गायी आणण्याचा संकल्प आहे. हळूहळू तेही आपण करणार आहोत. राजकीय आणि सामाजिक कार्यात व्यस्त असताना काही वेळ काढून आपण या तबेल्यावर नियमित येतो. गायींची सेवा करण्यात खऱ्या अर्थाने समाधान मिळते आणि दिवसभराचा थकवाही क्षीण होतो. या गायींपैकी बहुतांश गायी दुभत्या आहेत. त्यामुळे रोज सुमारे १५० लीटर दूध उत्पादन होते. हे दूध मित्रवर्गच येथून घेऊन जातात. गायीचे शेण आणि गोमूत्र संकलन करून आपण ते आपल्या शेतातच वापरतो. सध्या या तंत्रातून भाताची शेती केली आहे. गीर गायीचे दूध आणि तूप तसेच गोमूत्र हे शहरी भागात दुर्मीळ होत चालले आहे. अध्यात्मात आणि आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचे खूप महत्त्व सांगितले आहे. त्याचा अभ्यास आपण करीत असल्याचेही भरत गावीत यांनी सांगितले.
माझ्या आईचे निधन झाल्यानंतर शेतात आल्यावर नियमित आठवण येते. ही आठवण भरुन काढण्यासाठी गो पालनाचा हा निर्णय आपण घेतला. गो सेवेत खऱ्या अर्थाने समाधान वाटते. त्यामुळे येथे आल्यावर शेण उचलण्यापासून इतर कामेही आपण स्वत: करतो. त्यातच खऱ्या अर्थाने आनंद मिळत आहे.-भरत गावीत,माजी अध्यक्ष, जि.प. नंदुरबार.