रोटरी नंदनगरीच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक मनोज मोहन गायकवाड तर सचिवपदी अनिल सोहनलाल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये न्यू.डी.एस.के. सभागृहांमध्ये झाला. सामाजिक क्षेत्रामध्ये रचनात्मक कार्य करण्यात रोटरी क्लब नेहमीच अग्रेसर राहते. अनेक आणिबाणीच्या प्रसंगी रोटरी क्लब ही आपले उत्तरदायित्व निभावत असते. सामाजिक विचारांनी भारावलेल्या सभासदांनी रोटरी क्लब नंदनगरी या संघटनेत मोठे भरीव कार्य केले आहे. म्हणूनच सामाजिक जान असलेल्या सभासदांचा पदग्रहण सोहळा झाला.
कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही पदाधिकारी आपल्याच परिवारातील असल्याचे सांगत सामाजिक कार्यात त्यांनी यापूर्वीच भरीव कार्य केले असल्याचे सांगीतले. राजकीय पातळीवरून कुठलेही सहकार्य लागल्यास रोटरी सोबत आपण कायमच उभे राहणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नंदुरबार रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष प्रधान यांनी रोटरीची माहिती देताना ‘इच वन ब्रिंग वन’ म्हणजेच प्रत्येकाला सामाजिक कार्याच्या कक्षेत आणण्याचे ध्येय बाळगून रोटरी कार्य करीत असल्याचे सांगितले. ही संस्था गरजूंना सेवा देण्याचे पुण्य कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोटरी क्लब नंदनगरीचे मावळते अध्यक्ष नागसेन पेंढारकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोरोनाचा उद्रेक उडाला असताना रोटरी मार्फत बहुमोल जनसेवा करता आल्याचे समाधान व्यक्त केले.
नवीन जबाबदारी शिरावर घेतलेले नूतन अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून आपल्या कारकिर्दीत शिक्षण, जलसंवर्धन, पर्यावरण, पाणी आडवा पाणी जिरवा, आरोग्य या सारखे बहुमोल सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब नंदनगरीचे नूतन सभासद म्हणून ॲड.सुशील गवळी, इद्रिस होरा व उद्योगपती उदय जोशी यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी विशाल चौधरी, नीलेश तवर, शब्बीर मेमन, प्रितेश बांगर, नरेश नानकानी आदी उपस्थित होते. आभार नवनियुक्त सचिव अनिल शर्मा यांनी मानले. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी मानले. याप्रसंगी सर्व रोटरी मेंबर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला शोभा आली होती.