लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियान गावपातळीवर राबविले जात आहे. या अभियानातंर्गत नंदुरबार तालुक्यातील वडझाकण येथे शिवार फेरी, अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पांदन रस्ते मोकळे करणे, विशेष शिबिर घेऊन दाखले वाटप करणे, शिधापत्रिका वितरित करणे, इत्यादी उपक्रम राबविले जात असून, याचा शुभारंभ सरपंच कोचऱ्या वळवी यांच्या हस्ते २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या वेळी मंडळ अधिकारी अनेश वळवी, तलाठी बालाजी बिडकर, ग्रामसेवक व्ही.डी. वळवी, कृषी सहाय्यक गणेश पाटील, धारासिंग नाईक, गुलाब कोकणी, दिनेश वळवी, गुलाब पाडवी, रामसिंग वळवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील वडझाकण येथे महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून गावाच्या परिसरात शिवार फेरी काढण्यात आली. शिवार फेरीतून पांदन रस्ता, गाडी रस्ता अतिक्रमित झाल्याचे निदर्शनास आले. अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासंदर्भात गावात दवंडी देऊन गावातील शेतकऱ्यांची बैठक तलाठी बिडकर यांनी घेतली. यात त्यांनी आपापसातील बांधावरील भांडण-तंटे सोडून सर्वांनी एकत्र येऊन अतिक्रमित रस्ता मोकळ्या करण्याच्या कामात पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले. या कामात लोकांनी सहभाग घेऊन हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. हा रस्ता अतिक्रमित असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना चिखलातून वाट काढत जावे लागत असे बैलगाडीदेखील जाणे शक्य नव्हते. शेतातील पिकवलेला माल डोक्यावर घेऊन घरी यावे लागत होते. ही पायपीट साऱ्या कुटुंबाला करावी लागत असे. अशावेळी कित्येक दिवसाचा अतिक्रमित झालेला रस्ता मोकळा होताना पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. रस्ता खुला झाल्याने १२७ शेतकऱ्यांना या रस्त्याचा वापरासाठी उपयोग होणार आहे. यामुळे शेतीमध्ये पोहोचण्यास लागणारा वेळ व श्रम यांची बचत होणार असून, शेतातील पिकविलेला माल वाहनाच्या किंवा बैलगाड्यांच्या साह्याने आणण्यास मदत होणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातच मिळत असल्याने हे अभियान सर्वसामान्य माणसाला समाधान देणारे असून, या अभियानाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
वडझाकणला महाराजस्वअंतर्गत रस्ता काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 12:38 IST