लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने अनेक परप्रांतीय मजूर पायपीट करीत गावाकडे परतत आहेत. पायपीट करून थकल्यानंतर दुपारच्यावेळी अनेक जण रस्त्यालगत झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे चित्र शहादा-खेतिया मार्गावर जागोजागी दिसून येत आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांचे हाल होत आहेत. गुजरातमध्ये रोजगारासाठी गेलेले परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने व पायपीट करीत गावाकडे परतत असल्याचे रस्त्यांवर जागोजागी दिसत आहेत.बिहार राज्यातील बाका जिल्ह्यातील ३५ मजुरांची टोळी शहादा-खेतिया मार्गावर सहकुटुंब चालत जातानाचे भीषण चित्र पहायला मिळाले. दिवसभर चालायचं, दुपारी रस्त्यावर मिळेल त्या झाडाखाली विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळी व रात्रभर पायपीट करायची. जिथं मिळेल तिथं आणि कुणी देईल ते खायचं, अशी त्यांची दिनचर्या झाली आहे. गुजरात राज्यासह इतर जिल्ह्यातील कंपनीत काम करणाºया मजुरांना संबंधित कंपन्यांनी वाºयावर सोडले आहे. कंपनीने कोणतीही सोय आम्हाला उपलब्ध करुन दिलेली नाही, असा आरोप गावाकडे निघालेल्या परप्रांतीय मजुरांनी केला. घरात खायला नाही, मग तेथे राहून तरी काय उपयोग, येथे मरायचे असेल तर चालत जाऊन गावी पोहोचायचा मार्ग निवडला आहे. मरण हे कायम आहे. जर वाटेत मरण आले तरी चालेल. पण येथे थांबायचे नाही, असा विचार मनात या मजुरांनी घेतला असून ते पायपीट करीत परतीकडे निघालेले आहेत.पायी निघालेल्या मंजुरांना समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींकडून जागोजागी मदत करण्यात येत आहे. ब्राह्मणपुरी येथील सरीबेन इंदास पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी. पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत या मजुरांची जेवणाची सोय केली. त्याचबरोबर इतरांकडून बिस्कीट व चिवडा वाटप करण्यात आला.गेल्या दीड महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार कमी व्हावा यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु अडकलेल्या मजुरांचे हाल होत आहे. ज्याजागी कामाला त्या ठिकाणचे मालक मजुरांना पायी आपल्या घरी सोडून देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मजुरांना वाहनांची सोय नसल्याने त्यांना अक्षरश: पायी नाईलाजाने पायी प्रवास करावा लागत आहे.
दुपारच्यावेळी विश्रांती घेत परप्रांतीय मजूर निघाले गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:13 IST