कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रशासनाने लसीकरणाची केंद्रेही वाढवली असून, ४५ वर्षांवरील मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब यासारखे आजार असलेले व ६० वर्षांवरील ज्या नागरिकांनी नोंदणी केली आहे, अशांना विविध केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. शहादा तालुक्यात १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, त्यात शहाणा, राणीपूर व कुसुमवाडा या आरोग्य केंद्रांमध्ये नेटवर्कची समस्या असल्याने नोंदणीसाठी अडचण येते. त्यामुळे या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केंद्र ठेवले नाही. उर्वरित ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरातील डॉ. बी.डी. पाटील यांचे सुश्रुत नर्सिंग होम व दत्त हॉस्पिटल शहादा या दोन केंद्रांमध्ये दिवसभर लसीकरण सुरू होते. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कंसात लसीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या अशी- शहरी भाग (१८५), सारंगखेडा (८६), वडाळी (१२३), कहाटूळ (११०), मंदाणे (१००), वाघर्डा (४०), सुलवाडा (८०), आडगाव (२८), पाडळदा (५४), कलसाडी (१००), प्रकाशा (१३२), पुरुषोत्तमनगर (१००), म्हसावद (१३०), अशा एकूण तालुकाभरातून एक हजार २६८ नागरिकांनी विविध केंद्रांवर लसीकरण करून घेतले.
लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करू नये. शिस्तीत लसीकरण करून घ्यावे. लसीकरणानंतर केंद्रात दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
-डॉ.राजेंद्र वळवी, तालुका आरोग्य अधिकारी, शहादा