लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 14 : तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील 153 पुलांचे स्ट्ररल ऑडीट केले असले तरी या पुलांच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्याचे चित्र आहे. यातील बहुतेक पुलांची स्थिती अतिशय कमकुवत असल्याचे म्हटले जाते. निधीअभावी दुरूस्तीची शक्यता मावळल्यामुळे यंदाही जनतेला जीव मुठीत घालून येथून प्रवास करावा लागणार आहे. पुलांच्या निधीसाठी निदान लोकप्रतिनिधींनी तरी पाठपुरावा करण्याची मागणी आहे.कोकणातील रायगड जिल्ह्यातील सावित्री पुलाच्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमिवर राज्य शासन खळबळून जागे झाले होते. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्वच लहान मोठय़ा पुलांचे स्ट्ररल ऑडीट आपल्या यंत्रणेमार्फत करण्यात आले होते. तळोदा तालुक्यातील पुलांचे ऑडीटही येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. जवळपास 153 पुलांचे ऑडीट या विभागाने केले. त्यांच्या दुरूस्तीकरीता राज्यशासनाकडे साधारण एक कोटीचा निधीचा प्रस्तावदेखील पाठविण्यात आला आहे. मात्र कार्यवाही अभावी तसाच धूळखात पडला आहे. परिणामी निधीअभावी सदर पुलांची दुरूस्तीही यंदा रखडण्याचे चित्र आहे. वास्तविक यातील बहुसंख्य पुलांची स्थिती अतिशय कमकुवत झाली आहे. पावसाळ्यात केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता नकारता येणार नाही. दुरूस्तीच्या निधीसाठी संबंधित बांधकाम विभागाच्या प्रशासनाने अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. परंतु निधी उपलब्धतेबाबत अजूनही ठोस अशी कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप आहे. दुरूस्तीअभावी जनतेला यंदाही अशा कमकुवत पुलावरून आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागणार असल्याची व्यथा आहे. यातील काही पुल अंकलेश्वर-ब:हाणपूर या महामार्गावरील आहेत. येथून अवजड वाहने जात असतात. विशेष म्हणजे आमलाड येथील पुलाचे उदाहरण देता येईल. या पुलाची स्थितीही अत्यंत शोचनीय झाली आहे. त्याची आज पावेतो दुरूस्ती झालेली नाही. निदान लोकप्रतिनिधींनी तरी तालुक्यातील पुलांची गंभीर स्थिती पाहून निधीसाठी शासनाकडे ठोस प्रयत्न करावे, अशी जनतेची मागणी आहे.
निधीअभावी पुलांची दुरुस्ती रखडली : तळोदा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:16 IST