दक्षिणकाशी प्रकाशा येथे श्रावण महिन्यात विविध धार्मिक उत्सव साजरे होतात. गावातील मेनरोडवरून मिरवणूक, प्रभातफेरी, पालखी काढण्यात येते. तसेच ग्रामस्थही याच रस्त्यावरुन नेहमी ये-जा करतात.
बसथांबा ते गांधी चौकापर्यंत काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र गांधी चौकापासून गावात येताना मोहन नथ्थू चौधरी, जगदीश पटेल, राजाराम सुपडू चौधरी यांच्या घरासमोर रस्त्याची दूरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून खडी वर आली आहे. श्रीराम चौक ते तोताराम महाराज मंदिरापर्यंत काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र तोताराम महाराजमार्गे छोटे बालाजी मंदिर, ब्राह्मण गल्ली, चौधरी गल्लीमार्गे भैरव चौकापर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. गढी, कुंभार खाच, मच्छी बाजार, गुरव गल्ली, भोई गल्ली, न्हावी गल्ली, मुंजडा हाटी, चौधरी गल्ली, झिंगाभोई गल्ली, कुंभारखाच प्लांटकडे येताना याच दोन मार्गावरून यावे लागते.
या रस्त्यावरुन पायी चालणेही कठीण झाले असून रोज शेती कामानिमित्त ट्रॅक्टर ट्राली बाहेर काढणे, व्यवसायासाठी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने नेतानाही कसरत करावी लागते. विविध योजनांच्या निधीतून गावातील गल्लींमध्ये, चौकाचौकात काँक्रीटीकरण झाले असून ग्रामपंचायतीने लक्ष घालून मेनरोडचेही नव्याने काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे.