तळोदा : येथील नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याची विभागाचा थकीत वीज बिलापोटी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पालिकाही पाणीपट्टी वसुलीसाठी सरसावली आहे. या वेळी सोमवारी चक्क थकबाकी दारांच्या घरासमोर वाद्य पथक लावून वसुली करण्यात आली.
याप्रसंगी नागरिकही अवाक झाले होते. तळोदा नगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकाना पाणीपुरवठा केला जातो. नागरिक पाणीपट्टी नियमित भरत नसल्यामुळे पलिकाही वीज वितरण कंपनीचे वीज बिल वेळेवर देऊ शकत नाही. तब्बल ४४ लाखापेक्षा अधिक वीज बिल थकल्यामुळे वीज वितरण कंपनीने शुक्रवारी पाणीपुरवठा करणाऱ्या ३२ कूपनलिकांचा वीजपुरवठाच खंडित केला होता.
पालिकेने आठ लाख रुपये बिल भरल्यानंतर त्यातील पाच कूपनलिकांचा पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. ही थकीत रक्कम भरण्यासाठी नगरपालिकादेखील प्रचंड वाढलेली पाणीपट्टी वसुली करीता सरसावली असल्याचे दिसून येत आहे. सोमवारपासून पालिकेने वसुली मोहीम हाती घेतली असून, पालिकेचे वसुली पथक चक्क वाद्य पथकासोबत थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल, ताशा वाजवत आहेत. साहजिकच बघ्यांची गर्दी घरासमोर जमत असल्यामुळे थकबाकीदारदेखील आपली थकीत रक्कम देत असल्याचे पथकाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र या पूर्वी घरपट्टी वसुलीसाठी पालिकेने बॅण्ड पथक लावले होते. आता पाणीपट्टी वसुलीकरिता वाद्य पथक लावल्याने शहरवासियांमध्ये एकच चर्चा रंगली होती. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी नारायण चौधरी, जगदीश सागर आदी परिश्रम घेत आहेत.