जिल्ह्यात शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार, धडगाव, नवापूर अशा सहा तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समित्या कार्यरत आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत केवळ शहादा व नवापूर या दोन पंचायत समितीत पूर्णवेळ गटविकास अधिकारी नियुक्त असून उर्वरित चार पंचायत समित्यांमधील कारभार हा प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत हे काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याने तेथील गटविकास अधिकारी पद रिक्त असून सहायक गटविकास अधिकारी महेश वळवी यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. धडगाव व अक्कलकुवा पंचायत समितीचा गाडादेखील मागील वर्षभरापासून प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. अक्कलकुवा गटविकास अधिकाऱ्यांची गेल्यावर्षी नवापूर येथे बदली झाल्याने तेव्हापासून अक्कलकुवा पंचायत समितीचा कारभार हा प्रभारी गटविकास बघत आहेत. अक्कलकुवा पंचायत समितीत गटविकास अधिकारी पदाचा पदभार हा पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. धडगावचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांची यांची गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सातारा जिल्ह्यात बदली झाली होती. तेव्हापासून धडगाव पंचायत समितीच्या कामकाजाची मदार प्रभावी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सप्टेंबरपासून ते आतापर्यंत जवळपास चार प्रभारी गटविकास अधिकारी बदलेले आहेत. सध्या शहादा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी यांच्याकडे धडगाव पंचायत समितीचा गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार आहे.
तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांचे कोरोनामुळे २७ एप्रिल रोजी निधन झाले. त्यानंतर तळोदा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रभारी पदभारामुळे ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण विकासाची व्यवस्था ही पंचायत समितीवर अवलंबून आहे. त्यामुळे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गटविकास अधिकारी हे ग्रामविकास खात्यातील महत्त्वाचे पद आहे. पंचायत समितीची अधिकृत कागदपत्रे स्वतः च्या सहीने हस्तांतरीत करणे किंवा जतन करणे. पंचायत समितीच्या सर्व कामकाजाचे सनियंत्रण करणे, पंचायत समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, पंचायत समितीच्या इतर अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रक तयार करणे, ग्रामविकासाच्या विविध योजनांना चालना देणे आदी कामे गटविकास अधिकाऱ्यांची असतात. परंतु चार पंचायत समित्यांमध्ये प्रभारी गटविकास अधिकारी असल्याने विकास कामांच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत आहेत. प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांकडे मर्यादित अधिकार असतात. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने विकास कामांना खीळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
वेबसाईटवर जुनेच अधिकारी व संपर्क
तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार व धडगाव पंचायत समितीचा कारभार प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र नंदुरबार जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पंचायत समितीच्या जुन्याच तत्कालीन अधिकाऱ्यांची नांवे व संपर्क क्रमांक आहेत. तळोदा पंचायत समितीचा पदभार रोहिदास सोनवणे यांच्याकडे असून त्यांचे नाव अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून दिसत आहे. तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून सावित्री खर्डे यांचेच नाव दिसते. नंदुरबार पंचायत समितीचा पदभार महेश वळवी यांच्याकडे असताना गटविकास अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या अशोक पटाईत यांचे नाव आहे तर धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून सी.टी. गोस्वामी असताना जुने अधिकारी बी.डी. गोसावी यांचे नाव आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होत असल्याने अनेक जण संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवत असतात. मात्र नंदुरबार जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पंचायत समितीनिहाय गटविकास अधिकाऱ्यांची व संपर्क क्रमांकांची माहिती अद्ययावत नसल्याने संकेतस्थळावर जाऊन नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांची माहीती मिळवणाऱ्यांना चुकीची उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने संकेतस्थळावरील गटविकास अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक पंचायत समितीनिहाय अद्ययावत करणे गरजेचे आहे.