लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये अत्याचार व विनयभंगाच्या घटना सुरूच आहेत असा आरोप करीत महिला सुरक्षिततेबाबत त्वरीत कडक कायदे बनविण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावीत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरूवात झाली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी करीत अत्याचार घटनांच्या निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर याठिकाणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन दिले. निवेदनात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे.अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. राज्यातील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. शासनाला निवेदन पाठविले. परंतु, घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधाविधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई सरकारने घेतली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मोर्चात प्रदेश सदस्य सविता जयस्वाल, नगरसेविका संगीता सोनवणे, अॅड. उमा चौधरी, संगीता सोनगिरे यांच्यासह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:14 IST