नंदुरबार : जवाहर नवोदय विद्यालयाचा इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नंदुरबार व नवापूर तालुक्यालाही मध्यवर्ती ठरेल असे श्रावणी, ता.नवापूर येथे विद्यालयाची इमारत साकारणार आहे. त्यासाठी ३३ एकर जागा आणि २५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.केंद्राच्या मणुष्यबळ विकास मंत्रालयाने सहा वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यासाठी दुसरे जवाहर नवोदय विद्यालय मंजुर केले आहे. नंदुरबार व नवापूर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यालयाच्या इमारतीसाठी जागेची आणि निधीच अडचण होती.केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून नंदुरबार जिल्ह्यासाठी दोन जवाहर नवोदय विद्यालये मंजूर केली आहेत. आधीच अक्कलकुवा येथे एक विद्यालय सुरू आहे. दुसरे विद्यालय नंदुरबार व नवापूर तालुक्यासाठी मंजुर करण्यात आले. परंतु त्यासाठी जागा नाही, निधी नाही व इतर प्रशासकीय बाबींचीही पुर्तता वेळेवर झाली नाही. त्यामुळे अनेक वर्ष हे विद्यालय रखडले होते. अक्कलकुवा येथील विद्यालयाच्या इमारतीतच ते सुरू होते. अक्कलकुवा येथे जागा अपूरी पडू लागल्याने विद्यालय नंदुरबारातील क्रिडा संकुल आवारात स्थलांतरीत करण्यात आले.अखेर जागा मिळालीनवोदय विद्यालयाच्या जागा व निधीसाठी विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी प्रयत्न सुरू ठेवला. तत्कालीन मणुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे त्यांनी विद्यालयाची निकड लक्षात आणून दिली. तत्कालीन मंत्री स्मृती इराणी यांनी जागा आणि निधीची तरतूद करून दिली. श्रावणी, ता.नवापूर शिवारात ३३ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय २५ कोटी रुपयांचा निधी देखील मंजुर करण्यात आला आहे.राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी केल्याने सद्याच्या जिल्हा क्रिडा संकुलात या विद्यालयाचे तात्पुरते कामकाज सुरू करण्यास मान्यता मिळविली होती. श्रावणी येथे इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत याच ठिकाणी हे विद्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू राहणार आहे.विद्यार्थ्यांची होणार सोयअक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात पूर्वी संपुर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. परंतु तेथील जागेची अडचण, विद्यार्थी प्रवेश क्षमता, भौतिक सुविधा या बाबी लक्षात घेता अक्कलकुवाचे जवाहर नवोदय विद्यालय हे अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व शहादा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तर नंदुरबार व नवापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय-२ हे राहणार आहे.
दुसऱ्या नवोदय विद्यालयाचा इमारतीचा प्रश्न अखेर निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:50 IST