लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मंदिरात भजनाला परवानगी व लॉकडाऊनच्या काळात अडचणीत आलेल्या गायक-वादक आदी कलावंतांना शासनाने विशेष मदत करावी याबाबतचे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज व भाजपचे अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले महाराज व अखिल भारतीय संन्यासी संप्रदायाचे स्वामी विश्वेश्वरानंद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, देशात कोरोनासारख्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्वच घटक पालन करीत आहेत. लग्नविधी, मंगलकार्य, अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली असून ठराविक वेळेत दुकाने उघडून सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. असे असताना छोट्या छोट्या मंदिरातील भजन, पूजन, काकडा आरती आदी उपासनापद्धती बंद आहेत. याआधी शासनाकडे निवेदन देऊनही व मंडळाच्या जिल्ह्याजिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही मंदिरातील भजन, हरिपाठ, काकडा आदींना परवानगी देण्याविषयी विचार शासनाकडून झालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात अडचणीत असलेल्या गायक, वादक, लहान प्रवचनकार आदींना शासनाकडून रेशनचे धान्य स्वरूपात काही रक्कम मिळावी याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अद्यापही त्याचा विचार झालेला नाही. या सर्व बाबींचा विचार करून किमान २५ ते ५० लोकांना लहान मंदिरात नित्याचे भजन-पूजन करण्याची व प्रवचन करण्याची शासनाने परवानगी द्यावी व लॉकडाऊनच्या काळातील अडचणीत असलेल्या कलावंतांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. राज्यपाल यांच्याशी चर्चा होऊन शासनास तसे निर्देश करण्यात येतील, असे आश्वासन आचार्य तुषार भोसले महाराज, ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज व स्वामी विश्वेश्वरानंद यांना राज्यपालांनी दिले. त्यामुळे काकडा, हरिपाठ व लहान प्रवचन आदींसाठी किमान २५ ते ५० लोकांना परवानगी मिळेल याची खात्री वाटते, अशी माहिती खान्देश विभागीय अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी दिली.
मंदिरात भजन-प्रवचनाला परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 13:06 IST