कोठार : तळोदा शहरात मोठ्याप्रमाणात अवैध वीज कनेक्शन कार्यरत आहे. विद्युत वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून अवैध वीज कनेक्शनधारकांना अभय दिले जात असून, नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांकडून अवैध वीज कनेक्शनचे बिल वसूल केले जात असल्याची शंका नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. शिवाय अनेक ठिकाणी गृह उद्योग व औद्योगिक कामे सुद्धा सुरू आहेत. यातील अनेक ठिकाणी अवैध वीज कनेक्शन जोडण्यात आले आहे. नागरिकांकडून याबाबत ओरड सुरू झाली की, वीज वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून दिखाव्यासाठी थातूरमातूर कारवाई करून दोन ते चार अवैध वीज कनेक्शनधारकांवर कारवाई केली जाते. मात्र इतर अवैध कनेक्शनधारकांना मात्र अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. संबंधित घर बांधकाम करणारे ठेकेदार व वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांचे या प्रकारात साटेलोटे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तळोदा शहरात मागील अनेक काळापासून जादाची वाढीव वीजबिल, बिना रीडिंग वीजबिल, रीडिंगनुसार वीजबिल येणे, अवाच्या सव्वा वीजबिले येणे अशाप्रकारे वीजबिलांबाबत मोठ्या प्रमाणात अनागोंदी वाढली आहे. ज्यादा येणाऱ्या वीजबिलांमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. अवैध वीज कनेक्शनधारकांचे वीजबिलदेखील नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांकडून वसूल केले जात असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरातील घरगुती वीजग्राहकांना अवाच्या सव्वा वीजबिल येण्याचे सत्र सुरूच असून, वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी याबाबत हातवर केले आहेत. आम्हाला याचे काही देणे घेणे नाही ज्याप्रमाणे रीडिंग असेल त्याप्रमाणे वीजबिल येईल, अशा पद्धतीची उत्तरे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना देण्यात येतात. त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. एका महिन्याची घरघुती वापराची बिले तब्बल आठ ते नऊ हजाराची आकारली जात आहे. असे असताना ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सक्ती करण्यात येत आहे. तळोदा शहरात वाढीव वीजबिलासंदर्भात अनेक वर्षांपासून नागरिकांच्या तक्रारी असताना संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या समस्यांचे कोणते प्रकारचे समाधान वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेले नाही. वीजबिलांच्या अनागोंदी बाबत ग्राहकांचे समाधान करण्यास वीजवितरण कंपनीने असमर्थ ठरले असल्याचे सांगितले जात आहे. वाढीव वीजबिलाचे सत्र सुरूच असल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शहरात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. या रोषाचे रूपांतर जनआंदोलनात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दक्षता घेऊन नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अभियंत्यांची तक्रारदारांसोबत मुजोरी
वाढीव बिलासंदर्भातील तक्रारी असणाऱ्या ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क करून अभियंत्याकडे याबाबत विचारणा केली असता अभियंत्याच्या मुजोरी पणाला ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी शहरातील ग्राहकांना यांचा पुन्हा एकदा अनुभव आला. शहरातील काही नागरिक वीज वितरण कंपनीचे उपअभियंता इमरान पिंजारी यांच्याकडे वाढीव बिलांबाबत तक्रार घेऊन गेले होते. यावर ग्राहकांचे समाधान न करता इम्रान पिंजारी यांनी ग्राहकांना अरेरावीची उत्तरे दिली. तुम्हाला जेथे तक्रार करायचे असेल तेथे तुम्ही तक्रार करू शकतात याबाबत वाढीव वीजबिले कोणत्या प्रकारे कमी केली जाणार नाहीत अशा पद्धतीने या शब्दात त्यांनी ग्राहकांना उत्तरे दिली. यामुळे वीज वितरण कंपनीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड रोषाची भावना आहे. तळोदा येथे कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून, ग्राहकांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यामुळे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारदेखील केली जाणार असल्याचे समजते.