नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या १३९ आश्रम शाळा सोमवार, १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणी करण्यासाठीचेही नियोजन करण्यात आले आहे.
आश्रम शाळांचे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास १५ फेब्रुवारीपासून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व आश्रम शाळांमध्ये निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे. शिक्षकांच्या कोरोना स्वॅब चाचण्या आधीच झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्याही कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. तसे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण १३९ आश्रम शाळा आहेत. त्यात ७४ शासकीय आश्रम शाळा असून ६५ अनुदानीत आश्रम शाळा आहेत. पाचवी ते आठवीचे जवळपास २२ हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत आणने, त्यांच्या आहाराची व्यवस्था करणे यासह इतर बाबींसाठी गेल्या आठ दिवसांपासून नंदुरबार व तळोदा आदिवासी प्रकल्प विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक व आश्रम शाळा व्यवस्थापन यांनी नियोजन केले आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याची मोठी कसरत राहणार आहे.