नंदूरबार : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यासाठी वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.
पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात यावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी लॉकडाऊनचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सर्व नागरिक घरी असून, आवश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत आहेत. पावसाळ्यात विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याची पूर्वतयारी म्हणून गेल्या दोन महिन्यापासून वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफिलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.