जुनवानी गावात खरीप हंगामातील मान्सूनपूर्व नियोजन कार्यक्रमासाठी विभागीय विस्तार विभागाचे प्रमुख एम. एस. महाजन व कृषी विज्ञान केंद्र नंदूरबारचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे, तालुका कृषी अधिकारी गोपाल गढरी, कृषी सहायक दिलीप गावीत, किरण पाडवी, रामसिंग वळवी, आदी उपस्थित होते.
परिसरातील शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व तयारी म्हणून खरीप हंगामातील पेरण्या व पूर्व नियोजनासह लागवड पद्धतीचे महत्त्व एम. एस. महाजन यांनी पटवून दिले. रासायनिक खतांचा वापर टाळून गांडूळ खत व सेंद्रिय खताचा वापर अधिक करून आपल्या शेतीतील उत्पन्नात अधिकाधिक वाढ करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीतील भात, वरई व नागणी लागवड पद्धतीत वाफे पद्धतीचे महत्त्व पटवून दिले.
दहातोंडे यांनी मार्गदर्शन करताना परिसरात उत्पन्न होणाऱ्या भगर व बंटीचे वन डिस्ट्रिक वन प्रोडक्टची संकल्पना मांडून भगर या पिकाचे परिसरासाठी महत्त्वाचे असून, त्याच्या नवीन जातीची लागवड परिसरात व्हावी म्हणून बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिपल गावित यांनी बीज प्रक्रियेतून पिकांचे संरक्षण व कीड नियंत्रण यावर मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते धिरसिंग वसावे यांनी आपल्या शेतकरी बांधवांना संबोधित करताना परंपरागत सेंद्रिय भाज्या व अन्न पदार्थांची माहिती आपल्या बोली भाषेत समजून सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी शेतकरी शास्त्रज्ञ मंचकडून मोलगी परिसरातील निवड झालेल्या रामसिंग वळवी व रायसिंग यांना सदस्य कार्ड देण्यात आले. त्याच प्रमाणे महिलांसाठी परसबाग बियाणे किट व शेतकऱ्यांसाठी वरई आणि नागणी पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले.