लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा/प्रतापपूर : शनिवारी संपूर्ण दिवस व रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिनोदा गावाजवळ वडाचे जीर्ण झाड उन्मळून पडल्याने प्रतापपूर मार्गाकडील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती. यामुळे बससेवाही बंद करण्यात आली होती. पडलेले झाड हटविण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून सायंकाळर्पयत सुरूच होते. सुदैवाने रात्रीच्यावेळी हे झाड पडल्याने अप्रिय घटना घडली नाही. मात्र वाहतूक कोठार-रोझवा रस्त्याकडून वळविण्यात आल्याने जनतेची प्रचंड गैरसोय झाली होती. दरम्यान, शहादा रस्त्याचेही काम सुरू असल्याने डामरखेडय़ाजवळ चिखल साचल्याने सर्व वाहने बोरदमार्गे येत होती.गेल्या शुक्रवारपासून संपूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यातच शनिवारी संपूर्ण दिवस व रात्रभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे चिनोदा गावानजीक धनराज आनंदा मराठे यांच्या शेताजवळील रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे मोठे जीर्ण झाड उन्मळून पडले होते. हे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने साहजिकच रस्ताही व्यापला गेला आहे. परिणामी प्रतापपूर, रांझणी, राणीपूरकडील वाहतूक रविवारी दिवसभर ठप्प झाली होती. यामुळे या मार्गावरील बससेवाही दिवसभर बंद होती. रविवार असल्याने शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान टळले. मात्र कोठार, रोझव्याकडून वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना या गावांना वळसा घालून प्रवास तर करावा लागलाच परंतु भाडेही जास्त मोजावे लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. हे झाड सुदैवाने रात्रीच्या सुमारास पडल्याने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. या रस्त्यावरील चिंच व वडाची बहुसंख्य झाडे जीर्ण झाली आहेत. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा घटनांची गंभीर दखल घेऊन अशी झाडे हटविण्याबाबत कार्यवाही करण्याची गरज आहे. शनिवारी रात्री रस्त्यावर उन्मळून पडलेले झाड हटविण्याचे काम रविवारी सायंकाळर्पयत सुरूच होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. आधीच चिनोद्यापासून रांझणी फाटय़ार्पयत रस्त्याचे काम ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात हाती घेतले आहे. त्यामुळे खडीवरुन वाहन काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. आता जीर्ण झाडांच्या पडझडीमुळे वाहनधारकांच्या अडचणीत भर घातली आहे.दरम्यान, शहादा रस्त्याकडील वाहतूकदेखील महामार्गाच्या कामामुळे डामरखेडय़ाजवळ प्रचंड चिखल झाल्याने ठप्प झाली होती. ही वाहतूक बोरदमार्गे वळविण्यात आली होती. अगदी बससेवाही या मार्गावरुनच सुरू होती. यात अवजड वाहन चालकांची प्रचंड गैरसोय झाली होती. संबंधित विभागाने याबाबत दखल घेण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
प्रतापपूर रस्त्यावरील वाहतूक दिवसभर ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:07 IST