नंदुरबार आरटीओ कार्यालयाचा अनागोंदी कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे. अधिकारी वेळेवर नसणे, वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नसणे यासह इतर कारणांमुळे हे कार्यालय नेहमीच चर्चेत असते. आता कार्यालयाने वीज बिलाचा भरणाच केला नसल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. साधारणत: २२ ते २५ हजार रुपये बिल थकले असल्याचे सांगण्यात आले. वारंवार पत्र देऊनही कार्यालयाने वीज बिल भरणा करण्याबाबत चालढकल केल्यामुळेच वीज खंडित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे आरटीओच्या दैनंदिन कामकाजावर मात्र परिणाम झाला.
मंगळवारी सकाळपासूनच विविध कामानिमित्त वाहनमालक, चालक व सामान्य नागरिक उपस्थित होते. परंतु वीज पुरवठा नसल्याने कामकाज सुरूच होऊ शकले नाही. कार्यालयात असलेल्या जनरेटरचा अद्याप उपयोग घेतला गेला नसल्याने ते बंदच असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. इन्व्हर्टरचा बॅकअप देखील नसल्याने कर्मचारी हातावर हात धरून बसल्याचे चित्र होते. दुपारपर्यंत अनेक नागरिक कंटाळून निघून गेले. त्यामुळे संतापही व्यक्त करण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.