तब्बल दोन वर्षांपासून म्हसावद ते खेतिया फाटा या सहा किलोमीटर अंतराचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. दोन वर्षात किरकोळ दुरुस्ती, डागडुजी केली जात आहे. दुरुस्तीनंतर १५ दिवसात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होत आहे. या रस्त्यावर पूर्णतः खड्डे झाले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हे समजेणासे झाले आहे. खड्ड्यांची खोली व रूंदीही वाढल्याने चारचाकी वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. नवलपूर, आवगेजवळ चढावावर, उतारावर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक टाकण्यात आले आहे. परिणामी गंभीर अपघात होऊन दोघांचा मृत्यू तर इतर जखमी झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे माणसांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास होऊन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी तसेच तोरणमाळकडे शनिवारी, रविवारी जाणारे अधिकारी यांना रस्त्याची दुरवस्था दिसूनही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रित करून म्हसावद ते खेतिया फाटा दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
म्हसावद ते खेतिया फाटा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST