लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ठाणेपाडा जंगलगात मांडूळ सापाची तस्करी वन विभागाने हाणून पाडली. पथकाने पाठलाग करून एकास ताब्यात घेतले तर इतर तीन ते चार जण पळून गेले. मांडूळ सापासह तीन दुचाकी व इतर मुद्देमाल असा एकुण दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या एकास तीन दिवसांची कोठडी देण्यात आली असून शनिमांडळ येथील संशयीतांचा शोध सुरू आहे.वन विभागाच्या गस्ती पथकाला माहिती मिळाल्यावर पथकाने ठाणेपाडा जंगलात ही कारवाई केली. तीन दुचाकींवर तीन ते चार जण मांडूळची खरेदी-विक्री करतांना पथकाला दिसले. पथकाने अचानक तेथे धाड टाकली असता सर्वजण आपल्या दुचाकी सोडून तेथून पसार झाले. पथकाने पाठलाग करून वग्रलाल गवळी चव्हाण रा. जामदे ता. साक्री याला शिताफीने ताब्यात घेतले. घटनास्थळावरून मांडूळ जातीचा साप, डिजीटल वजन काटा आणि तीन दुचाकी जप्त केल्या. चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून माहिती घेतली. त्याने शनिमांडळ येथील काही जणांची नावे सांगितली असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी, प्रथमेश हाडपे, आर. बी. पवार, प्रशांत हुमणे, वनपाल एस. एम. पाटील ,पी डी पवार, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई ,अभिजीत पाटील, वनरक्षक अरविंद निकम, भुपेश ताबोळी, कल्पेश अहिरे, भानुदास वाघ,एस. पी. पदमोर, लक्ष्मण पवार, दीपक पाटील, प्रतिभा बोरसे, रेखा गिरासे, ममता पाटील, पुनम सोनवणे, नयना हडस, विशाल शिरसाठ, वाहन चालक लालसिंग पावरा यांनी ही कारवाई केली.
ठाणेपाडा जंगलात मांडूळ विक्रीचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:40 IST