नंदुरबार : जिल्ह्यात यंदा सरासरीइतका पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. शिवाय काही भागात अती पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता कोरोनानंतर पावसाळ्यात पुराची धास्ती नदीकाठच्या लोकांना लागून आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज ठेवण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दोन मोठ्या व सात लहान नद्या आहेत. त्यापैकी तापी नदीवरील शहादा व नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये नेहमीच पुराचा धोका असतो. याशिवाय सातपुड्यातून वाहणाऱ्या उतारावरील नद्यांमुळेदेखील पुराचा धोका असतो. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधले असल्याने पाण्याच्या फुगवट्यामुळे अनेक गावे बुडित क्षेत्रात येतात. यंदा अती पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा द्यावा लागणार आहे. त्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षालादेखील सज्ज ठेवण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरीय दोन बैठकादेखील झाल्या असून, आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत.