ब्राह्मणपुरी, ता. शहादा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल जैस्वाल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बमनाला, जिल्हा खरगोन येथे आंब्याची रोपे लावून विश्व आदिवासी दिवस साजरा केला. यावेळी डॉ. रितेश जयस्वाल, विजय मासरे, डॉ. शेलन जयस्वाल, अजय शर्मा, बाळकृष्ण जयस्वाल आदी उपस्थित होते.
खेडदिगर येथे शालेय साहित्य वाटप
खेडदिगर, ता. शहादा येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त डॉ. मुकेश मोरे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कर्मचारी कविता चौहान, अंकिता भोसले, आशा भोसले, भूषण मगर आदी उपस्थित होते.
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार
नंदुरबार येथील एस. ए. मिशन प्राथमिक शाळेत विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुषमा पाडवी होत्या. यावेळी आदिवासी संस्कृती दाखविणारे पोस्टर, मुखवटे, खाद्यपदार्थ, दैनंदिन उपयोगी वस्तू, दागिने यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले. शिक्षक चंद्रकांत माळी, सतीश शिरापुरी, अधिकार पाटील, शरद घुगे, पंकज साळी, प्रतिभा निकुंभ, चेतना पाटील, मेघना वसावे, विजय वळवी, मंजुषा वसावे, शीतल पाटील, मनीषा खैरनार, मिलका पठारे उपस्थित होते.
कुढावद येथे फलक अनावरण
कुढावद, ता. शहादा येथे विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक वाद्यांसहित वाजत गाजत आदिवासी एकता परिषदेचे फलक अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी कवी वाहरू सोनवणे होते. फलकाचे उद्घाटन नामदेव पटले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेलसिंग पावरा, जिल्हा सचिव अनिल चौहान, कवी संतोष पावरा, सुरेश मोरे, डॉ. मनीलाल शेल्टे, जगदीश पवार, दीपक ठाकरे, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ तसेच परिसरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी आपवासी दामू ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक वसंत पावरा यांनी केले. नामदेव पटले, जयसिंग माळी, डॉ. मनीलाल शेल्टे यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात प्रसिद्ध विद्रोही साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या ‘आदिवासी साहित्य आणि चळवळ’, कवी संतोष पावरा यांचे ‘ढोल कविता संग्रह तसेच विद्रोही साहित्य संस्कृती चळवळ’, महाराष्ट्राच्या वतीने २८ वे सांस्कृतिक एकता महासंमेलन झाबुआचे विशेषांकदेखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमास शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनीही भेट दिली. सूत्रसंचालन संतोष पावरा यांनी केले तर आभार दीपक ठाकरे यांनी मानले.
माध्यमिक विद्यालय, तळवे
तळवे, ता. तळोदा येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते याहामोगी माता व स्वातंत्र्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रमाकांत चौधरी, वसंत मराठे, देविदास मोगल, साहेबराव पाटील, गजेंद्र गोसावी, अनिल टवाळे, राम सूर्यवंशी, अनिल इंदीस, संजय तनापूरे, आर. जी. माळी, अनिल मगरे, गजानन माळी, चंद्रकांत कर्णकार उपस्थित होते.