लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषीत बालकांचे सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करावे. अर्भक मृत्यू रोखण्यासाठी संस्थात्मक प्रसुतींवर भर द्यावा असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. जिल्हा परिषदेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त डी.डी.शिंदे, अरविंद मोरे, सहायक आयुक्त प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, भुपेंद्र बेडसे, सर्व खाते प्रमुख आणि गट विकास अधिकारी उपस्थित होते. गमे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकूल योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकूलांचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. पात्र लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ देण्यासाठी महाआवास अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. घरकूल बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. यासाठी सर्व यंत्रणेने एकजूटीने काम करावे. कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करताना एकही बालक सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. माता आणि बालकांच्या पोषणाबाबत जनजागृतीवर भर देण्यात यावा. कुपोषण दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. विशेषत: दुर्गम भागातील बालकांच्या पोषणाबाबत विशेष दक्षता घ्यावी. अर्भक व माता मृत्यू कमी करण्याचे प्रयत्न करावे. संस्थात्मक प्रसृतीवर भर द्यावा. प्रति हजार पुरुषामागे महिलांच्या घटत्या दराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. पात्र बचत गटांना डिसेंबर अखेरपर्यंत निधी वितरीत करण्यात यावा. बँकांकडे प्रलंबित प्रकरणांबाबत बँक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार घरकूलांचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे गावडे यांनी यावेळी सांगितले. घरकूलांच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. गमे यांनी घरकूल योजना, स्वच्छता अभियान, उमेद अभियान, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला बालकल्याण आदी विविध विषयांचा आढावा घेतला.
कुपोषीत बालकांच्या योग्य सर्व्हेक्षणासाठी नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:58 IST