लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मेवासी वनविभाग तळोदाकडून यंदा आपल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीसाठी तयारी करण्यात आली असून साधारण सव्वा तीन लाख विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वनविभागाला आता पावसाची प्रतीक्षा लागून आहे.तळोदा मेवासी वनविभागात तळोदा व अक्कलकुवा या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तळोद्यासह खापर, अक्कलकुवा, मोलगी, काठी व वडफळी असे सहा रेंज आहेत. या वनविभागाचे साधारण ६० हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीसाठी मेवासी वनविभागाने यंदाही तयारी केली असून त्यासाठी मजुरांकडून खड्डेही खोदून तयार ठेवले आहेत. साधारण तीन लाख ३० हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन असल्याचे वनविभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यात सिसम, लिंब, साग, खैर, बांबू, आवळा, अंजन, चिंच, महुफूल अशा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे. त्यासाठी स्वत:च्याच रोपवाटिकाही तयार केल्या आहेत. सर्वात जास्त लागवड खैर वृक्षाची करण्यात येणार आहे. एक लाख ८७ हजार खैर जातीची लागवड करण्यात येणार आहे. त्याखालोखाल बांबूची लागवड करण्यात येणार आहे. बांबूचीही एक लाखापेक्षा अधिक रोपे लावणार आहे. असे असले तरी ही रोपे किती प्रमाणात जगतात हाही एक संशोधनाचाच भाग आहे. कारण वनविभाग एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर ते जगले की नाही शिवाय त्यांच्या निगाबाबतही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे तेथे केवळ वृक्षांऐवजी खड्ड्यांचेच अस्तित्व दिसून येते. वनविभाग ८० टक्के रोपे जगल्याचा दावा करत असते. परंतु प्रत्यक्षात त्याचे सर्वेक्षण होणेदेखील गरजेचे आहे. वास्तविक वृक्ष लागवड वाढीसाठी शासनाचा सतत प्रयत्न असतो. त्यासाठी प्रचंड निधीही खर्च केला जातो. मात्र लावलेल्या रोपांचे संगोपन आणि निगा राखण्यासाठीही संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने सात कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला होता. यासाठी शासनाच्या सर्वच यंत्रणांना वृक्षारोपणाचे विशिष्ट टार्गेट दिले होते. मोठा गाजावाजा करून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली होती. सर्वच रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षही लावण्यात आले होते. मात्र त्यातील मोजकेच रोपे जगल्याचे चित्र आहे. निगाअभावी शासनाचा पैसा वाया गेल्याचे म्हटले जात आहे.
सव्वा तीन लाख वृक्ष लागवडीचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:14 IST