दरम्यान गेल्या महिन्यात खतांच्या दरांवरुन गोंधळ उडाला होता. परंतू शासनाने खतांचे सुधारित दर प्रकाशित केले असून यात युरिया २६६ रुपयांत मिळणार असून उर्वरित मिश्रखतांचे दर हे ९७५ ते १ हजार २०० रूपयांच्या दरम्यान असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांना संपर्क केला असता, केंद्र शासनाने खतांवरील वाढवलेल्या अनुदानामुळे रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यानुसानर रासायनिक खत कंपन्यांनी सुधारित किमती घोषित केल्या असून शेतक-यांनी सुधारित किमतीने खतांची खरेदी करावी असे सांगितले. दरम्यान सुधारित किमतीपेक्षा जादा दराने विक्रेत्याकडून दर आकारणी होत असल्यास शेतक-यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क करुन माहिती दिल्यास तातडीने कारवाई करणार असल्याची माहितीही कृषी विकास अधिकारी लाटे यांनी दिली.