तळोदा : सामाजिक सलोखा बरोबरच कोरोना महामारी बाबत असलेल्या शासकीय नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मैनेक घोष होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत, तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रा. रमेश मगरे, विश्वनाथ कलाल, निसार मक्रानी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र माळी, नगरपालिकचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, सहायक प्रकल्प अधिकारी नेहा भोसले आदी उपस्थित होते.
आमदार पाडवी म्हणाले की, गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात सर्व समाजबांधव सहभागी होत असतात. त्यामुळे गणेश भक्तांनी यासाठी योग्य नियोजन करावे. सामाजिक सलोख्यात कोणतीही बाधा येणार नाही यांची काळजी घ्यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाचे नियम व अटी यांचे पालन करून हा सण शांततेने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी गणेश उत्सवातील शासनाच्या निर्बंधाबाबत मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष अजय परदेशी, विश्वनाथ कलाल, निसार मक्रानी, संतोष माळी, पंचायत समिती सदस्य विजयसिंह राणा, रसिकलाल वाणी, अनुप उदासी, राजाराम राणे, वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी भूषण माळी यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला पोलीस पाटील, बापू पाटील, बालू राणे, विजय सोनवणे, अतुल सूर्यवंशी, रईस अली, किरण राणे, तुषार जोहरी, मुन्ना ठाकरे, संजय शेंडे, नगरसेवक योगेश पाडवी, सुनील चव्हाण, दीपक चौधरी, राजू पाडवी, पंकज तांबोळी, रितेश सोनार, हितेश तांबोळी, दगुलाल माळी, अखिल अन्सारी, राजू टवाळे, मुन्ना कुरेशी यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा तर सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी केले.