दरडींसाठी उपाययोजनांची गरज
धडगाव : तळोदा ते धडगाव दरम्यान चांदसैली घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात घडतात. यातून वाहतूक ठप्प होते. यंदाही असे प्रकार घडण्याची भीती असल्याने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुर्गम भागातील जनजीवन पूर्वपदावर
धडगाव : कोरोनामुळे लावलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर दुर्गम भागातील जनजीवनही पूर्वपदावर येवू लागले आहे. दुर्गम भागातील बहुतांश नागरिक संसर्ग होवू नये, या भीतीने गाव व पाड्यांवरुन धडगाव किंवा अक्कलकुवा परिसरात येणे टाळत होते. परंतू संसर्ग कमी होवून रुग्णही आढळून येत नसल्याने बाजारपेठा पूर्ववत होत आहेत. बाजारपेठेत बाहेरगावचे विक्रेतेही दाखल होत आहेत.
बसेस सुरु झाल्याने व्यवसायही झाले सुरु
नंदुरबार : एसटी बसेस सुरु झाल्याने बसस्थानके गजबजली आहेत. यामुळे प्रवाशांवर अवलंबून असलेले व्यवसायही सुरु झाले आहेत. यात प्रामुख्याने रसवंतीगृहे, खाद्यपदार्थ विक्री, पाणी विक्री यांचा समावेश आहे. यातून व्यावसायिकांना रोजगार मिळत आहे.
शासकीय कार्यालयेही गजबजली
तळोदा : अनलाॅकमुळे शासकीय कार्यालये गजबजली आहेत. तळाेदा येथील प्रशासकीय संकुल, पंचायत समितीत वर्दळ वाढली आहे. शासकीय कामे सुरु झाल्याने याठिकाणी नागरीकांची गर्दी वाढत असून कामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनानंतर अनेक ठिकाणी जागृतीची गरज
नंदुरबार : कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या कुटूंबियांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या घरी येणे-जाणे अनेकांकडून टाळले जात आहे. मयतांच्या कुटूंबातील व्यक्ती निगेटिव्ह असल्याचे अहवाहलही प्राप्त असतानाही त्यांच्यासोबत संवाद आणि संपर्क टाळला जात असल्याचे समोर आले आहे. यातून अनेकांना नैराश्य आले असून यातून अनुचित प्रकारही घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ते निर्मितीची प्रक्रिया यंदा रखडणार
नंदुरबार : शहरालगतच्या ग्रामीण हद्दीत विविध रस्ते निर्मितीची प्रक्रिया रखडली आहे. रस्ते निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पातोंडा, होळ तर्फे हवेली तसेच वाघोदा शिवारातील हे रस्ते आहेत.
झाडांच्या मोडतोडीची प्रकार गंभीर
नंदुरबार : शहरातील नवीन रस्त्यांवर दुभाजक टाकून झाडे लावण्यात आली आहेत. परंतू काही ठिकाणी ही झाडे तोडण्याचे प्रकार सुरु असून मोडतोडीच्या या घटनांमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आहे.
वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात बागायती पिकांचे संगोपन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या वेळेवर वीज पुरवठा सुरु असला तरी मध्येच वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार सुरु असल्याची माहिती आहे.
आरोग्य केंद्रांच्या बॅट-यांची दुरुस्ती करावी
धडगाव : तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये देण्यात आलेल्या ईन्व्हर्टर आणि त्यांच्या बॅट-या खराब झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे येथील कामकाजावर परिणाम झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.