लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरटीईअंतर्गत गरजू यंदा ४५ खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे़ यांतर्गत गटशिक्षणाधिकारी स्तरावर विद्यार्थी निवड झाली असली तरी १४७ विद्यार्थ्यांचे पालक मात्र शाळांच्या भेटीलाच गेलेले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे़कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्षाला खीळ बसली आहे़ तब्बल पाच महिन्यांपासून विद्यार्थी घरीच बसून आहेत़ शासन शाळा सुरू करण्यापेक्षा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देत आहे़ यात शिक्षणाचा अधिकारांतर्गत गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती़ नंदुरबार जिल्ह्यात या प्रक्रियेत ४५ शाळांचा समावेश करण्यात आला आहे़ प्राथमिक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती़ एकूण ४४२ जागांसाठी आलेल्या अर्जांमध्ये ४१२ मुलांची नावे अंतीम करण्यात आली आहेत़ सर्व सहा तालुक्यात पूर्ण केलेल्या प्रक्रियेंतर्गत २११ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ मात्र १४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम होवूनही त्यांच्या पालकांनी शाळांना अद्याप संपर्क केलेला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे़ ही प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आहे़ येत्या काही दिवसात शाळांकडून या विद्यार्थ्यांना रितसर अंतीम प्रवेश देवून त्यांच्या नावांची निश्चिती करण्यात येणार आहे़ परंतू पालकच आलेले नसल्याने पुढे काय, याचे उत्तर मात्र मिळालेले नाही़ प्राथमिक शिक्षण विभागाकडून उर्वरित ३० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी राज्य शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांकडून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत निर्णय होत नसल्याने आरटीई प्रक्रियेत समाविष्ट होवूनही पालकांनी अनुत्साह दाखवल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे़
आरटीईअंतर्गत विद्यार्थ्याची निवड होवून पालक टाळताहेत शाळांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:22 IST