लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोविड-१९ संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. बाधिताच्या संर्कातील किमान १५ जणांची कोविड चाचणी करावी. कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, आदी उपस्थित होते.गमे म्हणाले, कोरोनाबाधितांच्या मृत्यूमागील कारणाच्या विश्लेषणाच्या आधारे सर्वेक्षणातील त्रृटी दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबत संपर्क साखळी तोडण्यासाठी प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान १५ व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात यावी. मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगल्या उपाययोजना केल्याचे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी कोरोनाबाबत उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना लसीकरणाबाबत आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तळोदा येथे ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.महसूल कामाचा आढावा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्ह्यातील महसूल कामकाजाचा आढावा घेवून कामाबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कामकाजाचे चांगले नियोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी प्रलंबित बाबी त्वरीत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाने शेतकऱ्यांना मोजणी नकाशे वेळेवर द्यावे. महसूल उत्पन्नात वाढ आणि वाळू घाटांच्या लिलावावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले. उभारी कार्यक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार मिळेल असे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभही अशा कुटुंबांना देण्याची सूचना त्यांनी केली.
वसुंधरा अभियानातील मुल्यांकन वाढवावेविभागीय आयुक्तांनी वसुंधरा अभियानाचा आढावा घेतला. ते म्हणाले, डिसेंबर अखेरपर्यंत मुल्यांकन वाढविण्याचा प्रयत्न करावा. वृक्ष लागवडीवर भर देऊन पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात यावी. वायु संवर्धनासाठी सीएसआर अंतर्गत निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. लोणखेडा आणि प्रकाशा येथे उद्यान निर्मितीसाठी स्थानिकांना प्रोत्साहित करावे. नगरपालिका क्षेत्रात होणाऱ्या कामाची तपासणी करुन आढळणाऱ्या त्रृटीचे विश्लेषण करावे व त्याआधारे आवश्यक सुधारणा कराव्यात. अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले.
गेल्या बैठकीतील सुचनांचा घेतला आढावा... विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांनी पदभार स्विकारल्यानंतर नंदुरबारचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी आढावा बैठकीत केेलेल्या सुचनांची किती व कशी अंमलबजावणी झाली याची माहिती घेतली.गेल्या वेळी त्यांनी थेट कोरोना उपचार कक्षामध्ये जाऊन तेथील पहाणी केली होती. आता देखील कोरोना संदर्भात त्यांनी विविध सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय राजस्व अभियानाच्या अंमलबजावणीची देखील त्यांनी माहिती घेतली.