लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद व सहा पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर केवळ नंदुरबार तालुक्यातील वेळावद येथील एकच हरकत आली आहे. या हरकतीवर निकाल देवून 18 जून रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 7 जून रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद व पंचायत समितींमधील सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर 12 जूनर्पयत हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातून केवळ एकच हरकत आली आहे.वेळावद, ता.नंदुरबार येथील काही मतदारांची नावे ही गुजरात राज्यात देखील आणि स्थानिक ठिकाणी देखील असल्याची हरकत आहे. त्यावर पडताळणी करून निर्णय घेतला जाणार आहे. या हरकती व्यतिरिक्त एकही हरकत विभागाला प्राप्त झाली नाही.हरकत निकाली काढल्यानंतर 15 जून रोजी निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिप्रमाणीत करण्यात येणार आहे. 18 रोजी मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत उत्सूकता लागून आहे. धुळे येथील एका याचिकेवर दोन दिवसांपूर्वीच कामकाज झाले आहे. विधीमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात राखीव जागांबाबत काय व कशी घटनादुरूस्ती केली जाते. त्यानंतर न्यायालयात अहवाल देवून न्यायालय काय निर्णय देते यावरच निवडणुकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. असे असले तरी विधानसभा निवडणुकीच्या आधी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा प्रय} शासनाचा राहणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व सर्व तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात आहे.
मतदार याद्यांवर केवळ एक हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:06 IST